Sanjay Mandlik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून मुख्यमत्री झाल्यानंतर आता त्यांच्या गटात 12 खासदारही सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला चांगलेच खिंडार पडले आहे. फुटलेल्या शिवसेना खासदारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदारांचा समावेश आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटाशी जाऊन हातमिळवणी केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. या दोघांनी बंडखोरी केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून दोन शिवसेना खासदार होण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याला अवघ्या अडीच वर्षात सुरुंग लागला आहे. 


जाणून घ्या संजय मंडलिक यांचा राजकीय प्रवास 


संजय मंडलिक यांना राजकीय वारसा वडिल सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून मिळाला. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1964 रोजी झाला. त्यांनी राज्यशास्त्रामध्ये एम.ए. केलं आहे, तर  शिवाजी विद्यापीठातून बी. एड पूर्ण केले. त्यांचे वडील सदाशिवराव मंडलिक 1998 पासून 2009 पर्यंत कोल्हापूर मतदारसंघाचे खासदार राहिले. 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. राष्ट्रवादीशी बिनसल्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मंडलिक गटाची वाटचाल स्वतंत्र सुरु झाली. 


संजय मंडलिक यांनी वडिलांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 1998 मध्ये राजकीय नशीब आजमावले. त्यावेळी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर आरोग्य समितीचे सभापतीपद मिळाले. त्यांना 2003 मध्ये  कोल्हापूर जिल्हा सरकारी बोर्डावर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2012 मध्ये संजय मंडलिक यांना झेडपीचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. 


राष्ट्रवादीशी बिनसल्यानंतर शिवसेनेत प्रवेश 


जिल्हा बँकेच्या राजकारणातून खासदार सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये राजकीय ठिणगी पडली. त्यामुळे सदाशिवराव मंडलिक आणि राष्ट्रवादीमध्ये बिनसले आणि ते पक्षापासून दूर होत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात लढण्यासाठी  संजय मंडलिकांनी भगवा खांद्यावर घेत शिवसेनेत प्रवेश केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढताना  धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांचा पराभव केला. 


2019 मध्ये पराभवाची परतफेड पण बंटी पाटलांच्या मदतीने 


2014 मध्ये महाडिक गटाला लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक मदत करूनही विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना कोल्हापूर दक्षिणमधून पराभव स्वीकारावा लागला आणि भाजपचे अमल महाडिक यांचा विजय झाला. या पराभवानंतर  महाडिक आणि पाटील गटात राजकीय वाद वाढत गेला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्माला तिलांजली देत बंटी पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार असूनही संजय मंडलिक यांच्यासाठी आमचं ठरलंय म्हणून आपली संपूर्ण ताकद पणाला लावत संजय मंडलिक यांचा विजय सुकर केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ते जिल्हा बँकेवरही संचालक म्हणून निवडून आले आहेत. त्याचबरोबर हमीदवाडा कारखान्यावरही त्यांची सत्ता आहे. 


आता शिंदे गटाला साथ, पण मतदासंघातील कार्यकर्ते नाराज


संजय मंडलिक यांनी बंडाळी करताना दिल्लीचा मार्ग निवडला. आमदारांच्या बंडानंतर त्यांनी पक्षासोबत असल्याचे दाखवून दिले होते, पण केलेल्या बंडावरून त्यांची पडद्यामागून बोलणी सुरु होती  हे केलेल्या बंडावरून स्पष्ट झालं आहे. त्यांनी कागल तालुक्यातील मंडलिक गटाची मते  विचारात घेत त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, पण उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघ आणि शिवसैनिकांना त्यांनी विश्वासात न घेतल्याने त्यांच्याविरोधातील नाराजी दिसून येत आहे.


 इतर महत्त्वाच्या बातम्या