Hasan Mushrif on Sanjay Mandlik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड पडले आहे. एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना खासदार सेना गटाला गळाला लागले आहेत.


त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसैनिक एका बाजूला आणि त्यांच्या जीवावर निवडून आलेले नेते एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी शिवसेनेकडून कोण शड्डू ठोकणार? याची चर्चा आता रंगली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची कोणतीही इच्छा नाही. मात्र, पक्षाने आदेश दिल्यास मी त्याबाबत त्यावेळी विचार करेन, असेही त्यांनी नमूद केले. बंडखोर खासदार संजय मंडलिक आगामी लोकसभेचे गणित निश्चित करून शिंदे गटात सामील झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हसन मुश्रीफ रिंगणात उतरणार का? अशीही चर्चा रंगली आहे. 


संजय मंडलिक दिल्लीला जाताना भेटले 


दरम्यान, संजय मंडलिक यांच्या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, संजय मंडलिक दिल्लीला जात असताना भेटले. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर काय होणार याची कल्पना त्यांना दिली होती. मात्र, त्यांनी निर्णयावर शिक्कामोर्तब करूनच आले होते, असे मुश्रीफ म्हणाले. 


जेवण आम्ही केलं केवळ वाडपी म्हणून यांचं काम


दरम्यान, ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई रंगली आहे. या लढाईवरून मुश्रीफ यांनी  शिंदे सरकारला खोचक टोला लगावला आहे.  जेवण आम्ही केलं केवळ वाडपी म्हणून यांचं काम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे सरकार आल्यानंतर न्यायालयाचा निर्णय आला, पण सगळं काम आम्ही केल्याचे ते म्हणाले. 


दोन वर्षांपूर्वींच्या कामांना स्थगिती कशासाठी?


शिंदे सरकारने आल्यापासून रिव्हर्स गिअर टाकला आहे. यावरूनही त्यांनी भाष्य करताना दोन वर्षांपूर्वींच्या कामांना स्थगिती कशासाठी? अशी विचारणा केली. अधिवेशनात तरतुदी केलेल्या कामाचा निधी रोखणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. अलीकडील कामांना स्थगिती समजू शकतो, पण दोन वर्षापूर्वींच्या कामांना स्थगिती कशासाठी? अशी विचारणा त्यांनी केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या