मुंबई : मागीलवर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सहकार विभागाकडून आयोजित करण्यात आलेली बैठक निष्फळ ठरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या बैठकीसाठी राजाध्यक्ष जालिंदर पाटील प्रतिनिधींसह उपस्थित होते. त्यांनी बैठक निष्पळ झाल्याचे सांगत उद्या गुरुवारी पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापुरात पंचगंगा नदी पुलावर  चक्काजाम होणार असल्याचे म्हणाले. 


बैठकीनंतर जालिंदर पाटील काय म्हणाले? 


ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी दोन तास सहकार मंत्री यांच्या सोबत चर्चा झाली. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत असल्याचा शब्द दिला होता. मात्र, आजच्या बैठकीत सरकार शेतकरी सोबत असल्याचे वाटत नाही. जे कारखाने थकबाकी देणार आहेत, त्या कारखान्यांना परवानगी द्यावी अशी मागणी होती.त्यांनी सांगितले की, सहकार मंत्री यांनी सांगितलं की मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. मागील वर्षाचं काही मागू नका, यावर्षी करु अस कारखानदार यांचं म्हणणं आहे. मागील वर्षीच्या दुसऱ्या उचलीतील 400 रुपये आम्ही मागत आहोत. दिल्ली सारख आंदोलन होऊ नये, या आंदोलनात काही शेतकरी शहीद होतील असं आंदोलन असणार आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी. 


बेमुदत हायवे बंद करण्याचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार 


दरम्यान, राजू शेट्टी यांनीही निर्वाणीचा इशारा देत जोपर्यंत तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळत नाही तोपर्यंत कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. बेमुदत हायवे बंद करण्याचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचे म्हटले आहे. संघटनेच्या पदाधिकऱ्यांना आजच पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे तरीही आंदोलनाला जायचं आहे, कोणीही प्रमुख नसला तरी आंदोलनाला जायचं आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 


ते पुढे म्हणाले की,  पोलिसांना गुंगारा देऊन यायचं आहे. प्रत्येक घरातून एक माणूस आला पाहिजे. भाडोत्री माणसं आणून आंदोलनाला विरोध असल्याचे दाखवलं जात आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत, पण आपण खिशातील पैशातून आंदोलन करत आहोत. त्यामुळे उद्या कितीही महत्वाचं काम असलं तरी बाजूला ठेवा, दहा वाजेपर्यंत पंचगंगा पुलावर दर्ग्याजवळ जमून बेमुदत हायवे बंद करायचा आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. 


तर महत्वाच्या बातम्या