कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह (Kolhapur News) पश्चिम महाराष्ट्रात एका बाजूने तुटलेल्या ऊसाच्या 400 रुपयांसाठी आणि चालू मोसमात 3500 रुपयांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष सुरु असतानाच कारखान्यांच्या निवडणुकीने सुद्धा ऊसाचा फड चांगलाच तापला आहे. भोगावती साखर कारखान्यात पी. एन. पाटील यांनी सत्ता राखल्यानंतर आता ब्रिदी साखर कारखान्यासाठी (Bidri Sakhar Karkhana) रणसंग्राम सुरु झाला आहे. 


बिद्री साखर कारखान्याची निवडणूक जेवढी चर्चेत नाही, तेवढी चर्चा राजकारण्यांनी केलेल्या 'मळी'ची चर्चा रंगली आहे. वरिष्ठांना न जुमानता कारखाना आणि मतदारसंघ डोक्यात ठेवून केलेल्या खिचडीने पार भूगा होऊन गेला आहे. सत्ताधारी के. पी. पाटील गटाकडून सत्ता कायम राखण्यासाठी संघर्ष सुरु असतानाच त्यांचे नात्याने मेहुणे असलेले ए. वाय. पाटील निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना जाऊन मिळाले आहेत. ए. वाय. पाटील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत, पण ते अजित पवार गटाच्याच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या विरोधात गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात याच बिद्री कारखान्याच्या पार्श्वभूमीवर जे काही बोलले होते ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. 


काय म्हणाले होते अजित पवार?


अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात बोलताना म्हणाले होते की, या कोल्हापूर जिल्ह्यात मी अनेक वाईट गोष्टी अनुभवल्या आहेत. याठिकाणी के पी पाटील बसले आहेत. त्यांना कारखान्यात टाॅवर उभे करायचे होतं कोजेनसाठी, पण स्थानिक राजकारणात काही वर्ष घालवली. आता डिस्टिलरी करायची आहे, फाईल उत्पादन शुल्क मंत्र्यांकडे पडली आहे. मी शंभुराज देसाईंना फाईल क्लिअर करायला सांगितली.  


फाईल मंजूर करायची नाही. काय राव? 


मी जेव्हा उत्पादन शुल्क मंत्री होतो, तेव्हा कोणताही भेदभाव न करता मी फाईल मंजूर केल्या होत्या. कोण कोणत्या पक्षाचा याचा विचार केला नव्हता. काहींनी पाच लिटरच्या डिस्टिलरी सुरु केल्या, पण कोणाची फाईल थांबवली नाही. पण शंभुराज देसाई म्हणाले की, दादा शिंदे गटाच्या आमदाराने सांगितलं आहे की फाईल मंजूर करायची नाही. काय राव? कारखान्याच्या निवडणुकीत कारखाना घ्या ताब्यात, आमचं काही म्हणणं नाही. आडमुठेपणा कशासाठी? डिस्टिलरी सुरु झाली नाही, तर काढलेल्या कर्जाचं काय करायच? कोणी भुर्दंड सहन करायचा? ते पुढे म्हणतात, आम्हालाही विरोधक आहेत, पण विरोधकांच्या विधायक कामाला आम्ही विरोध करत नाही. निवडणुकीवेळी आम्ही निवडणुकीची मतं सांगू. जनता ठरवेल काय करायचं ते. पण विकास का थांबवायचा? तो एकट्या केपी पाटीलचा कारखाना नाही. हजारो सभासदांचा कारखाना आहे. माझ्या जिल्ह्यातही एवढे सभासद नाहीत. त्यामुळे सत्तेची नशा, मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका, माझी एवढीच कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे. 


ए.वाय. पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकरांचं जमलं!


बिद्री कारखान्याच्या निमित्ताने के. पी. पाटील आणि ए .वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करूनही त्यांच्यातील संघर्ष मिटण्याचे नाव घेत नसताना  ए. वाय. पाटील यांनी के. पी पाटील यांना धक्का दिला आहे. ए. वाय. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या छावणीत जाऊन  के. पी. पाटील यांना टक्कर देण्याचे ठरवले आहे. खासदार संजय मंडलिक, भाजपचे नेते समरजिंतसिंह घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर व ए. वाय. पाटील विरुद्ध माजी आमदार के. पी. पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात बिद्रीचे राजकारण पेटणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या