कोल्हापूर : मागील वर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. या मागण्यांकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदार लक्ष देत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या (23 नोव्हेंबर) बेमुदत पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग कोल्हापुरात पंचगंगा नदी पुलावर रोखण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे.


पोलिसांना गुंगारा देऊन यायचं 


राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, सहकारमंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे तोडगा निघाला असे होत नाही. जोपर्यंत तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळत नाही तोपर्यंत कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. बेमुदत हायवे बंद करण्याचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार आहे. साखर कारखानदारांनी दुसरी उचल आज जाहीर न केल्यास आम्ही ताकदीने आंदोलन करणार आहोत. 


संघटनेच्या पदाधिकऱ्यांना आजच पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे तरीही आंदोलनाला जायचं आहे, कोणीही प्रमुख नसला तरी आंदोलनाला जायचं आहे. पोलिसांना गुंगारा देऊन यायचं आहे. प्रत्येक घरातून एक माणूस आला पाहिजे. भाडोत्री माणसं आणून आंदोलनाला विरोध असल्याचे दाखवलं जात आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत, पण आपण खिशातील पैशातून आंदोलन करत आहोत. त्यामुळे उद्या कितीही महत्वाचं काम असलं तरी बाजूला ठेवा, दहा वाजेपर्यंत पंचगंगा पुलावर दर्ग्याजवळ जमून बेमुदत हायवे बंद करायचा आहे. 


सहकार मंत्र्यांसोबत बैठक


दरम्यान, आज (22 नोव्हेंबर) मंत्रालयात ऊसदर प्रश्नी राजू शेट्टी यांची सहकार मंत्र्यांसोबत बैठक होत आहे. मात्र या बैठकीला राजू शेट्टी मुंबईतून उपस्थित राहू शकत नसल्याने ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून VC द्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्यासह प्रमुख नेते हे मुंबईतील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. हसन मुश्रीफ यांनी बैठकीला दांडी मारली आहे. 


या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली मागणी राज्य सरकार आणि कारखानदार मान्य करतात का? की ही बैठकी निष्फळ ठरते याकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे लक्ष आहे. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग उद्या सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत अडवण्यात येणार आहे. आणि इथून पुढे होणाऱ्या नुकसानीला राज्य सरकार आणि कारखानदारच जबाबदार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या