Kolhapur Crime : व्हॉटस्ॲप् स्टेट्सवर मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ, असा मेसेज टाकून तरुणाने तरुणीचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात घडली. गिरोली घाट (ता. पन्हाळा) येथील पांडवलेणी परिसरामध्ये चार चाकी गाडीतून नेत तरुणाने तरुणीचा नॉयलान दोरीनं गळा आवळून व डोक्यात वार करून खून केला. त्याच ठिकाणी तरुणाने सुद्धा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


आज सकाळी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. लग्नाला विरोध केल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलताना तरुणीचा संपवत स्वत:ही आत्महत्या केल्याने दोन्ही कुटुंबाना चांगलाच धक्का बसला आहे. दोघेही नातेवाईक आहेत. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय 21, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. कैलास आनंदा पाटील (वय 26, रा. लिंगनूर, ता. कागल) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 


दोघेही नातेवाईक असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. मात्र, याला काही नातेवाईकांचा विरोध असल्यानेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कैलासला कामधंदा करत नसल्याने नातेवाईकांनी लग्नाला विरोध केला होता. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खुनानंतर कैलासने व्हॉटस्ॲप् स्टेट्सवर मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ, असा मेसेज टाकला. नातेवाईकांच्या ग्रुपवरही त्याने मेसेज टाकला. कैलासच्या वडिलांना रात्री आठच्या सुमारास विषप्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी तातडीनं वडगाव पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. 


त्यानंतर कोडोली पोलिस ठाण्यात त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कैलासचे लोकेशन पडताळून  गिरोली घाटाकडं धाव घेतली. त्यांना घटनास्थळी कैलास अत्यवस्थ अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. 


खूनाची बातमी समजल्यानंतर ऋतुजाचे नातेवाईकही तातडीने घटनास्थळी रवाना झाले. ऋतुजा डी. फार्मसीचे शिक्षण घेत होती, तेथेच ती वसतिगृहात राहत होती. कैलास व ऋतुजा नातेवाईक आहेत. त्यामुळे या प्रकारानंतर दोघांच्या नातेवाइकांना धक्का बसला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या