कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना भाजपकडून लोकसभेसाठी साकडं घालण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. राजू शेट्टीने महायुतीमध्ये सहभागी व्हावं यासाठी त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण राजू शेट्टी यांच्याकडून मात्र त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


या आधी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभेला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा सुरू होती. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतल्याची चर्चा होती. पण ती राजकीय भेट नव्हती असं स्पष्ट करून राजू शेट्टी यांनी आपण स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. 


राजू शेट्टी यांनी 2009 आणि 2014 साली असं दोन वेळा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. 2019 साली शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला होता. 


राजू शेट्टींसाठी ठाकरे गट आग्रही?


हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाकडे आहे, महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून लढावं यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटही झाली होती.


भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली


दुसरीकडे हा मतदारसंघ जरी शिवसेना शिंदे गटाकडे असला तरीही या ठिकाणी भाजपही दावा करू शकतो अशी माहिती समोर येत आहे. राज्यातल्या काही विद्यमान खासदारांना बाजूला सारून भाजपकडून नवीन चेहरा देण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. याचा फटका खासदार धैर्यशील मानेंना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांना तिकीट देऊन त्यांना महायुतीत घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.


राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद ही पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी आहे. त्यामुळे त्याचा लोकसभेला फायदा होऊ शकतो असा होरा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आहे. त्याचमुळे राजू शेट्टी यांनी महायुतीमध्ये यावं यासाठी भाजपकडून साकडं घातलं जात असल्याची माहिती आहे. 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोणत्या जागांवर दावा


1) हातकणंगले 
2) कोल्हापूर
3) सांगली
4) माढा
5) परभणी 
6) बुलढाणा 


ही बातमी वाचा: