कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) गडहिंग्लज (Gadhinglaj) तालुक्यात डोकेदुखीला कंटाळून शाळकरी विद्यार्थीनीने गळ्याला दोरी लावून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली. श्रावणी प्रकाश गोरुले (वय 17, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रावणीने राहत्या घरी छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
डोकेदुखीच्या त्रासाने निराश
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार श्रावणीचे वडिल प्रकाश गोरुले शिक्षक आहेत. सरंबळवाडी माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत असून त्याच ठिकाणी श्रावणी दहावीच्या वर्गात शिकत होती. श्रावणीला गेल्या पाच वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास सुरु होता. तेव्हापासून श्रावणीवर उपचार सुरु होते. याच महिन्यात 1 जानेवारी रोजी वैद्यकीय उपचारानंतर डॉक्टरांनी औषधांचा डोस बदलून दिला होता. मात्र, श्रावणीची डोकेदुखी कमी झाली नसल्याने निराश होती.
तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञाकडूनही उपचार करण्यात आले. त्याने सुद्धा काही फरक न पडल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात खासगी दवाखान्यातून उपचार सुरू होते. सोमवारी वडिल शाळेत गेल्यानंतर आणि आई कामात असतानाच श्रावणीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. आई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
भांडताना प्रेयसीचा गळा दाबल्याने मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इचलकरंजीमध्ये प्रियकराने भांडणात गळा दाबल्यानंतर जखमी झालेल्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरेखा राजू सोलनकर (वय 33, रा. चिपरी) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हेगार सचिन गौतम माने (रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेयसी व प्रियकर दोघेही मूळचे सांगलीचे आहेत. दोघांचे गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून भांडणं व्हायची. सचिन सुरेखाला यांना मारहाण करीत होता. अशाच भांडणात सचिनने सुरेखाला मारहाण केली व गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरेखा बेशुद्ध पडल्याने पळून गेला. यावेळी एकाने पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. जखमी सुरेखाला पहिल्यांदा आयजीएममध्ये आणि नंतर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. तिथं उपचारादरम्यान सुरेखाचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या