कोल्हापूर: पुढच्या आठ दिवसात ढोल वाजवणार, काठी बडवणार आणि भंडारा उधळणार आहे असं काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटलांनी (satej patil) जाहीर करून शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) प्रचाराचा नारळ फोडला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कार्यक्रमाच्यावेळी सतेज पाटलांनी काँग्रेस नेत्यांसमोर लोकसभेचे रणशिंग फुंकलं. त्यामुळे अद्याप जागावाटपावर चर्चा सुरू सतेज पाटलांनी मात्र कोल्हापुरातून लोकसभेचा प्रचार (Kolhapur Lok Sabha Election) सुरू करून आघाडी घेतल्याची चर्चा आहे. 


कोल्हापुरातून शाहू महाराज हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झालं आहे, पण ते कोणत्या पक्षातून लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आपल्याच पक्षाच्या तिकिटावर शाहू महाराजांनी लढावं यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. पक्ष कोणताही असला तरी प्रचाराची सर्व सूत्र मात्र सतेज पाटलांच्या हाती असणार हे नक्की. 


पुढच्या आठ दिवसात ढोल वाजणार, काठी बडवणार


सध्याच्या राजकारणावर टीका करताना सतेज पाटील म्हणाले की, सकाळचा माणूस संध्याकाळी कुठे असेल हे सांगता येत नाही. कोल्हापूर जागेसंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होती, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कार्यक्रमामुळे मी तिकडे गेलो नाही. आता पुढच्या आठ दिवसांनी ढोल वाजवणार, काठी बडवणार आणि भंडारा उधळणार. 


कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी


कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. उमेदवारी ठरली असली तरी कोणत्या पक्षाच्या चिन्हावर ते लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शाहू महाराजांनी आपल्याच पक्षाकडून लढावं यासाठी तीनही पक्षांचा प्रयत्न आहे. असं असलं तरी जिल्ह्यातील सतेज पाटलांचे नेटवर्क लक्षात घेता शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्याची शक्यता जास्त असल्याचं बोललं जातंय.


महायुतीचा उमेदवार ठरेना


मविआकडून शाहू महाराज यांचे नाव समोर आल्यानंतर महायुतीसमोर उमेदवाराचा पेच निर्माण झाल्याचं दिसतंय. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे पु्न्हा इच्छुक आहेत. पण  या ठिकाणी भाजपने दावा केल्याची माहिती समोर येत आहे. शाहू महाराजांच्या विरोधात राजघराण्यातील समरजीत घाटगे यांना उमेदवारी द्यावी असा एक कल भाजपमध्ये दिसतोय. असं झालं तर शाहू महाराज विरुद्ध समरजीत घाटगे अशी राजघराण्यातील व्यक्तींची लढत होणार आहे. 


ही बातमी वाचा: