Vishwajeet Kadam : आंबे खाण्यापासून ते टिकली लावण्यापर्यंत ते पार राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यापर्यंत संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. भिडे यांच्या वक्तव्याविरोधात संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियातूनही नेटकरी चांगलाच समाचार घेत आहेत. भिडे यांच्याविरोधात आज राज्यभर आंदोलने करून त्यांच्या बेताल वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी संभाजी भिडे यांची वयोमानानुसार वक्तव्यं येत आहेत का? असा खोचक सवाल केला आहे.  

Continues below advertisement


संभाजी भिडे यांचे वय पाहता वयोमानानुसार हे वक्तव्यं येत आहेत का?


विश्वजित कदम म्हणाले की, महात्मा गांधी यांच्याबद्दल चुकीचे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी. संभाजी भिडे यांचे वय पाहता वयोमानानुसार हे वक्तव्य येत आहेत का? हे देखील पाहिले पाहिजे, असेही आमदार कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. ते सांगलीत (Sangli News) कडेगावमध्ये बोलत होते. महात्मा गांधी यांना देशाने राष्ट्रपतीचा दर्जा दिला आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणे योग्य नसून महात्मा गांधीचं नव्हे, तर देशासाठी बलिदान देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा महापुरुषाबदल कोणीही चुकीचे वक्तव्य करता कमा नये, असे मत देखील आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.  


मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरीत गुन्हे दाखल करा 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अत्यंत खोचक शब्दात भिडे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करून मनोहर भिडे (संभाजी भिडे) यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केले आहे. भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलो आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य असे आहे. केवळ भारतच नाही तर जगभर गांधींच्या विचारांना आदर व सन्मान आहे. मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.


इतर महत्वाच्या बातम्या