Sangli News: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यामधील (Sangli News) कडेगावमध्ये मोहरम आज उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली होती. गावातील हिंदू समाजाचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत असतात. आज मोहरम दिवशी हा सोहळा दरवर्षीप्रमाणे उत्साहात संपन्न झाला. कडेगाव शहरातील जुने एसटी स्टँड चौकात ताबूत भेटी पार पडल्या. मोठ्या जल्लोषात गगनचुंबी ताबूत भेटींचा हा लक्षणीय सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कनार्टक राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. याठिकाणी पार पाडणारा मोहरम सण हा प्रतीक आहे. गेली दीडशे वर्षांपासून कडेगावमध्ये गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो. विशेष म्हणजे, गावातील बारा बलुतेदार एकत्र येऊन हा सण साजरा करतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे ते दोनशे फुट असणारे गगनचुंबी ताबूत अर्थात डोले. हे ताबूत बांधण्याचे काम सर्व समाजातील लोकांच्या माध्यमातून करण्याची प्रथा आहे. मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद नंतर या ताबूत बांधणीच्या कामाला सुरवात होते. विशेष म्हणजे या दीडशे फुटी उंच बांधण्यात येणाऱ्या ताबूता मध्ये कोठेही गाठ मारण्यात येत नाही.
सोहळ्याला ऐतिहासिक परंपरा
गगनचुंबी ताबूत सोहळ्याचा प्रारंभ हा येथील तत्कालीन संस्थानिक भाऊसाहेब देशपांडे सरकार यांनी केला. या मागेही विशेष कथा आहे. कराडमध्ये त्यावेळी पार पडणाऱ्या ताबूत भेटी सोहळा पाहण्यासाठी देशपांडे सरकार गेले असता, त्या ठिकाणी त्यांचा योग्य तो मानसन्मान झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या देशपांडे सरकार यांनी कडेगावमध्ये जगात नावाजले जाईल असा ताबूत भेटींचा सोहळा सूर करण्याचा निर्धार केला. त्या काळापासून कडेगावमध्ये सर्वसमावेशक असा मोहरमचा ताबूत भेटींची सोहळा सुरु झाला.
इतर महत्वाच्या बातम्या :