Kolhapur News: टोमॅटोचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडल्यानंतर अडचणीतील शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. मात्र, नेमकी हीच संधी साधून टोमॅटोवर डल्ला मारण्याचे भुरट्या चोरांकडून उद्योग सुरू झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या टोमॅटो शेतीची केलेली नासधूस ताजी असतानाच आता टोमॅटोच शेतातून चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाडमध्ये सीसीटीव्ही असतानाही चोरट्यांनी शेतातील टोमॅटो तोडून लंपास केले आहेत. 


सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी झाली आहे. शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतात टोमॅटोची चोरी झाली आहे. 20 गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरट्यांनी तोडून नेले आहेत. सीसीटीव्ही असताना देखील अंधार आणि पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी टोमॅटोवर डल्ला मारला. शेतकरी म्हस्के हे भाजीपाल्याची शेती करतात. त्यांनी 25 गुंठ्यांमध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. ते मागील दोन दिवसांपूर्वी शेतात येत पिकाची पाहणी केली होती. त्यांनी दोन दिवसांमध्ये टोमॅटो तोडण्याचे नियोजन केले होते. परंतु, शेतात आल्यानंतर टोमॅटोच नसल्याने धक्का बसला. 


दरम्यान, अवघ्या 15 दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील सांगवडेवाडीमध्ये शेतकरी अप्पासाहेब, राजेंद्र आणि बाबासाहेब दिनकर चव्हाण यांच्या मालकीच्या शेतीतील उभ्या पिकांचे अज्ञातांनी नुकसान केले होते. टोमॅटो, मिरची, कारलीच्या पिकाचे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाले आहे. दिनकर चव्हाण आणि त्यांच्या तीनही मुलांसह घरातील सदस्यांनी कष्टातून पीक आणले. त्यामध्ये टोमॅटो अर्धा एकर, मिरची आणि कारली प्रत्येकी 10 गुंठे इतके असून हातातोंडाशी आलेले पिक अज्ञातांनी उखडून टाकले. टोमॅटो विक्रीसाठी उपलब्ध होणार होते. टोमॅटोचा बाजारपेठेतील दर सव्वाशे रूपये ते दीडशेच्या घरात असून पंधरा ते वीस टन टोमॅटोचे उत्पादन अपेक्षित धरता वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचे अप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले.


'आम्ही लखपती धुळवडकर'


दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादक शेतकरी असून देशभरातून व्यापारी वर्ग नाशिकला टोमॅटो खरेदीसाठी येत असतो. टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन हे उन्हाळ्यात घेतले जाते. मात्र, दिवाळीकडे लिलावासाठी येत असलेल्या टोमॅटोला कवडीमोल भावात विक्री होत असते. गेल्या महिनाभरापासून टोमॅटोला विक्रमी दर मिळू लागला आहे. त्यामुळे बाजारात जवळपास 200 रुपये किलो टोमॅटो दर आहे. तर 20 किलोच्या कॅरेटला 2 हजार अडीच हजार रुपयांपर्यंत भाव आहे. हाच दर साधल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. सिन्नरच्या अनेक शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सिन्नरच्या धुळवड गावात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. उत्पन्न चांगलं मिळाल्याने अनेक शेतकरी कोट्यवधी झाले आहेत. त्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत असून याच पार्श्वभूमीवर बॅनर लावण्यात आले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या :