कोल्हापूर: राज्यातले शेतकरी वाऱ्यावर आणि स्वतःच्या शेताकडे जाण्यासाठी दोन हेलिपॅड, असा गरीब शेतकरी कुठे पाहिला नसेल असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला. कोल्हापुरात एक कॅरेक्टर आहे, घरात जाऊन मारामारी करतो, पण हा थोड्या दिवसांचा खेळ असून सरकार बदलणार आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागरांना (Rajesh Kshirsagar) टोला लगावला. गद्दारांच्यात हिंमत नाही म्हणून ते राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे गेले नाहीत असंही ते म्हणाले. 

Continues below advertisement

कोल्हापुरात एक कॅरेक्टर 

आदित्य ठाकरे यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात एकही दंगल झाली नाही. सहसा मी गद्दारांवर बोलत नाही. इकडे एक कॅरेक्टर आहे, घरात जाऊन मारामारी करतो. पोलिसांवर दबाव आहे, ते कारवाई करत नाहीत. पण त्या कॅरेक्टरला सांगतो सरकार बदलणार आहे. हे चालणार नाही, हा थोड्या दिवसाचा खेळ आहे. कोल्हापूर हे सर्वात आवडत शहर आहे माझं. कोल्हापूर कुस्तीची भूमी आहे, मी पण एक कुस्ती खेळतोय. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, आपले दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला पुन्हा आलो आहे. मागच्या वेळी आलो त्यावेळी अशीच गर्दी होती, असाच राग होता. आपल्या सभेला आणखी खुर्च्या लावल्या जात आहेत, नाहीतर अनेकांच्या सभेतून खुर्च्या गोळा कराव्या लागतात. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्या जास्त आणि लोक कमी असतात. यांच्या स्वतःच्या शेताकडे जाण्यासाठी दोन हेलिपॅड आहेत, असा गरीब शेतकरी कुठं पाहिला नसेल

Continues below advertisement

महाराष्ट्राचे उद्योग घेऊन गुजरातला जाता

कोरोनाच्या काळात एकही उद्योग राज्याबाहेर गेला नाही, त्याला म्हणतात विश्वास असं सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, आता नुसता फोटो काढून घेण्यासाठी फिरत असतात. ज्या ज्या वेळी शेतकरी संकटात आला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी साथ दिली. महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात या सरकार विरोधात राग, रोष आहे. चांगलं सरकार पडलं आणि हे गद्दार, खोके सरकार आणलं. महाराष्ट्र म्हणून आम्ही यांचं काय बिघडवलं आहे, जे आमचे उद्योग गुजरातला घेऊन जाता? 

खोके घेऊन सरकारमध्ये गेला, पण राज्य कुठे जातंय? 

आदित्या ठाकरे पुढे म्हणाले की, सरकार पाडलं पण त्यांनी काय मिळवलं ते सांगा. धोके, खोके घेऊन सरकारमध्ये गेला. पण आपलं राज्य कुठं जातंय याबद्दल काही वाटतं नाही का? आपल्या राज्यातून किती उद्योग गेले आणि किती उद्योग आले ते सांगा. सरकार कसं चालवायचं हे यांना कळत नाही. तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 मार्क म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यासारखं झालं. गुंतवणूक लोकांत करायची की या तिघांमध्ये करायची हे उद्योजकांना कळत नाही.

महाराष्ट्रावर अन्याय करणारं कोणतं कलम आणलंय? 

आदित्य ठाकरे म्हणाले की, 370 कलम हटवलं त्यावेळी आम्ही देखील स्वागत केलं, आनंदोत्सव साजरा केला. पण आता महाराष्ट्रावर अन्याय करणारे कोणते कलम आणले आहे का? दिल्ली सरकार मुगलांसारखं अंगावर येतं आमच्या. रवींद्र रायकर, रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई सुरू केली. जे स्वतः विकले गेले ते आम्हाला काय शिकवणार? हृदयात राम आणि हाताला काम हे महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे यांनी 'पहले मंदिर फिर सरकार' ही घोषणा दिली. आम्ही अनेकवेळा त्याठिकाणी गेलो, इथून पुढे देखील जाणार. 

ही बातमी वाचा: