Ambabai Mandir Navratri : नवरात्रौत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्यांना रांगेत उभा राहायचं नाही, अशा भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पेड ई पास सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, पेड दर्शन असू दे, पण व्हीआयपी दर्शनाला विरोध केला आहे.


व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली अनेकांना दर्शनासाठी सोडावं लागतं. त्यामध्ये देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांचा बहुतांश वेळ वाया जातो. त्यामुळे आता ज्यांना रांगेत उभा राहायचं नाही त्यांच्यासाठी पेड ई-पासची सुविधा केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. 


पासची किंमत माणसी 200 असणार 


पेड ई पासची किंमत माणसी 200 रुपये असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे.  मंदिरात प्रवेश केल्यानंतर तत्काळ बुकिंग करून पास मिळणार आहे. दरम्यान, यंदाचा अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय होणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात, मंदिर मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. तसेच  प्रवेशास परवानगी असलेल्या लोकांची संख्या, सक्तीचे ऑनलाइन बुकिंग इत्यादी निर्बंध घालून मंदिर उघडण्यात आले होते. 


यावर्षी मंदिरात दररोज मोठी गर्दी  होण्याची शक्यता


कोरोना संकट मागे सरल्याने राज्यात उत्सवांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव राज्यात कोणत्याही निर्बंधाविना पार पडला. त्यामुळे यंदा नवरात्रौत्सवही मोठ्या उत्साहात पार पडणार यात शंका नाही. अंबाबाईच्या दर्शनाला यावर्षी विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. सरासरी 25 लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र, यावेळी हा आकडा मोडीत निघण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या