Rajaram Sakhar Karkhana : राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला आहे. कसबा बावडा येथील कारखान्याच्या कार्यस्थळावर 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा होत असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची चिन्हे आहेत. 


गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चांगलाच राडा झाला. त्यामुळे सभा अत्यंत वादळी ठरली होती. विरोधकांकडून होत असलेल्या गदारोळानंतरही सत्ताधाऱ्यांनी एक तास 12 मिनिटे सभा चालवली होती. त्यामुळे राजाराम कारखान्याच्या सभेमध्ये गोकुळच्या सभेतील गदारोळाचा वचपा काढण्यासाठी रणनीती आखली जाईल यात शंका नाही.  


राजाराम कारखान्यावर महादेवराव महाडिकांची सत्ता


राजाराम कारखान्यावर महादेवरा महाडिक यांची सत्ता आहे. त्यामुळे कारखान्यातील सत्ता खेचण्यासाठी आमदार सतेज पाटील गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सत्तांतर करण्याच्या इराद्यानेच पाटील गट सक्रिय झाला आहे. कारखान्याचे 1300 सभासदांची नावे कमी करण्यावरून प्रकरण चांगलेच तापले. सध्या हा  वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडली आहे. 


कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी शेवटची सभा


कसबा बावड्यातील राजाराम कारखान्याच्या कार्यस्थळावर 30 सप्टेंबरला सभा होत आहे. त्यामुळे कारखान्याच्या आगामी निवडणुकीपूर्वीची ही शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा असेल. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून जोरदार तयारी केली जाण्याची शक्यता आहे.


गोकुळच्या सभेत शौमिका महाडिकांचा हल्लाबोल 


गोकुळच्या सभेत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या सभास्थळी आगमन होण्यापूर्वीच सभागृह भरल्याने त्या चांगल्याच संतापल्या होत्या. त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी झाली होती. सत्ताधाऱ्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचा आरोप करत समांतर सभा घेतली होती. तसेच सभेच्या ठिकाणावरूनही  टीका केली होती. 


त्यामुळे आता हाच मार्ग राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत अवलंबला जाण्याची शक्यता आहे. कसबा बावडा सतेज पाटील यांचा गड मानला जातो. त्यामुळे सभेच्या ठिकाणी त्यांचे पडसाद उमटतील यात शंका नाही. दुसरीकडे राज्यातील सत्तांतर आणि धनंजय महाडिक खासदार झाल्याने महाडिक गटालाही आता बळ आले आहे. सलग पराभवानंतर खासदारकी आल्याने महाडिक गटातही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. 


दहीहंडी कार्यक्रमानंतर खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या