Lumpy Skin Disease : देशात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) धोका वाढला आहे. मोठ्या प्रमाणावर जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील 19 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या आजारावर तातडीनं उपाययोजन करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. येत्या दहा दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करुन द्यावा. खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचा केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीने विमा उतरवण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
देशातील विविध राज्यात लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहे. गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि झारखंडनंतर लंम्पी स्कीन या आजाराने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. केंद्र व राज्य सरकार या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. या आजारात जनावरे दगावण्याची शक्यता असल्यानं पशुपालक चिंतेत आहेत. यातच लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. तातडीची उपाययोजना म्हणून येत्या दहा दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करुन द्यावा. खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरवावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांचा तुटवडा, अनेक ठिकाणी पदे रिक्त
गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये वेळेत योग्य उपचार न झाल्यानं लम्पी या आजारानं मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. सदर आजारातील देशी जनावरांच्या मृत होण्याची टक्केवारीचे प्रमाण जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गेले आहे. मात्र, संबंधित राज्य सरकारकडून अपयश लपवण्यासाठी चुकीची आकडेवारी दर्शवली जात आहे. या आजारामुळेच देशामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होवू लागला आहे. राज्य सरकारने लसीकरणास जरी सुरुवात केली असली तरी राज्यात पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांची पदे भरलेली नसल्याने डॅाक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे.
लम्पी स्कीनचा देशी जनावरामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग
लम्पी स्कीन आजाराचा प्रामुख्याने देशी जनावरामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. महाराष्ट्रात खिलार, साहिवाल, गीर, देवणी, कोकण गीर, रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावरांची संख्या जास्त आहे. बाजारांमध्ये जनावरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून, या आजारात जनावरे दगावल्यास पशुपालकांना हा मोठा फटका बसणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणं कोरोना काळात कमी हप्त्यामध्ये जनतेला विमा उपलब्ध करुन दिला त्याचप्रमाणे राज्यातील सर्वंच जनावारांचा येत्या दहा दिवसात तातडीने विमा उतरवण्यात यावा. जेणेकरुन एखादे जनावर यामध्ये दगावल्यास संबंधित पशुपालकास होणाऱ्या नुकसानीचे अर्थसहाय्य मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Lumpy Skin Disease : मराठवाड्यात 197 जनावरांना लम्पी स्कीनची लागण, 53 गावांमध्ये संसर्ग
- Lumpy Skin Disease : एकीकडं अतिवृष्टी तर दुसरीकडं लम्पी स्कीनमुळं दुग्ध व्यवसायावर परिणाम, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट