Jalna News : आगामी मान्सुन कालावधीत पूर (Flood) अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती ((Natural Disaster) येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे. आठ दिवसांत परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे सादर करावेत. प्रत्येक विभागाला देण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने कामे करावीत. पाटबंधारे विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नद्यांचे पुररेषाबाबतचे नकाशे तयार करुन 20 मे पूर्वी सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. मान्सून- 2023 पूर्वतयारी आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
जालना जिल्हा पूर प्रवण क्षेत्र असून जिल्हयात गोदावरी, दुधना, केळणा, पूर्णा, गिरजा या प्रमुख नद्या असून 7 मध्यम व 57 लघु प्रकल्प आहेत. यामुळे जिल्हयातील पूर रेषा आखणीचे काम तात्काळ पूर्ण होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात असलेल्या विविध पाणी साठवण प्रकल्पांसह साठवण तलाव, पाझर तलाव आदींची पहाणी संबंधित विभागाने करावी. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असेल ती तातडीने करुन घेण्यात यावी. संबधित विभाग व तहसिलदारांनी जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे येत्या आठ दिवसांमध्ये सादर करावेत. नदी काठची गावे व संभाव्य पूरपरिस्थितीत इतर सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरीत करता येईल, यासाठी उपाययोजना कराव्यात. अन्न-धान्य, पिण्याची पाण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात यावी.
आपत्तीच्या काळामध्ये विद्युत पुरवठा तसेच दुरध्वनी सेवा अखंडित सुरु राहील याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. पूरप्रवण, तलाव क्षेत्रामध्ये गावशोध व बचाव पथक, पूर्वसुचनागट, पट्टीच्या पोहणाऱ्या लोकांची अद्यावत यादी तयार करुन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदी, नाल्यांचे नैसर्गिक पात्र अतिक्रमणामुळे अरुंद झाले असेल तर अशा ठिकाणची अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना...
- सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत
- आपत्ती व्यवस्थापन आराखडे आठ दिवसांत सादर करावेत
- साठवण, पाझर तलावांची तातडीने दुरुस्ती करावी
- संभाव्य पुरपरिस्थितीत अन्न-धान्य,पिण्याचे पाणी,औषधींचा साठा सज्ज ठेवावा
- विद्युत पुरवठा, दुरध्वनी सेवा खंडीत होऊ देऊ नये
- नदी-नाल्यातील अतिक्रमणे काढावीत
- नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत
- शोध व बचाव पथक व साहित्यांची रंगीत तालीम करावी
- साथीचे रोग पसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी
- नादुरुस्त शाळा, अंगणवाडयांची तपासणी करावी
- विभागप्रमुखांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये
इतर महत्वाच्या बातम्या:
Jalna News: सातत्याने पाणी टंचाई, 'त्या' गावांचा जल जीवन मिशन आराखड्यात समावेश; पालकमंत्र्यांचे आदेश