Jalna Crime News: जालना शहरात (Jalna City) एक धक्कादायक घटना समोर आली असून, नायब तहसीलदार असलेल्या पतीचे एका महिलेशी असलेले अनैतिक संबंध, होणारी मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून पेशाने शिक्षिका असलेल्या एका महिलेने तलावातील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी जालना शहरात घडली असून, या प्रकरणात रविवारी दुपारी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री गणेश पोलास (वय 45 वर्षे, रा. जालना) असे मयत महिलेचे नाव असून, गणेश व्यंकटेश पोलास असे संशयित आरोपी असलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, जयश्री पोलास यांचा गणेश पोलास यांच्याशी 2000 मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. तर जयश्री पोलास या नेर जिल्हा परिषद शाळेवर शिक्षका असून, गणेश पोलास हे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. परंतु, विवाहाच्या 20 वर्षांनंतर 2020 मध्ये गणेश पोलास यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती जयश्री पोलास यांना मिळाली होती. त्यानंतर जयश्री पोलास यांच्यासह त्यांचे बंधू संजय बाबूलाल चिंतल व इतर नातेवाइकांनी गणेश पोलास यांची वारंवार समजूत काढली होती. परंतु त्यानंतर गणेश पोलास हे शिविगाळ, मारहाण करण्यासह मानसिक त्रास देत असल्याची माहिती जयश्री पोलास यांनी बंधू संजय चिंतल (रा. जालना) व नातेवाइकांना दिली होती.


तलावात उडी घेऊन केली आत्महत्या


आपल्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्यावर जयश्री यांच्याकडून गणेश यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. पण याचा कोणताही फरक झाला नाही. उलट गणेश पोलास यांच्याकडून जयश्री यांचा शारीरिक, मानसिक त्रास सुरु होता. त्यामुळे गणेश पोलास यांचे अनैतिक संबंध, होणारा शारीरिक, मानसिक त्रास यामुळे जयश्री पोलास यांनी शनिवारी दुपारी जालना शहरातील मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार संजय चिंतल यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार नायब तहसीलदार गणेश पोलास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. चैनसिंग घुसिंगे हे करीत आहेत.


पोलिसांकडून गणेश पोलासला अटक...


जयश्री पोलास यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांच्या माहेरच्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान जयश्री यांचे बंधू संजय चिंतल यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल होताच चंदनझिरा पोलिसांनी संशयित आरोपी नायब तहसीलदार गणेश पोलास याला ताब्यात घेतले आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crime News: अनैतिक संबंधातून दोघांची आत्महत्या; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना