Jalna News Update : 'लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही' अशी पुस्तकातील लोकशाहीची व्याख्या आपण सर्वांनी ऐकली आहे. अशीच लोकशाही आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत सांगणारा एक चिमुकला सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. प्रजासत्ताक दिनाच्या शाळेतील आवारात एका लहानग्याचं भाषण उभ्या महाराष्ट्रात गाजतंय. या लोकशाहीची मोक्कार व्याख्या करणाऱ्या मुलाला एबीपी माझाने अखेर शोधून काढलंय. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या रेवलगाव या साडेसहाशे लोक वस्ती असलेल्या गावातील हा चिमुकला आहे. कार्तिक जालिंदर वजीर असं या चिमुकल्याचं नाव आहे.  


लेवलगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिलीत शिकणाऱ्या कार्तिक जालिंदर वजीर याला गावात 'भोऱ्या' या नावाने ओळखलं जातं. त्यानं प्रजासत्ताकदिनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 


प्रजासत्ताक दिनी गावात शिक्षकांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित केली होती. या भाषण स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्यास बक्षीस ठेवलं होतं. त्यामुळे गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमालाही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित राहिली होती. यात इतर विद्यार्थ्यांबरोबरच कार्तिकने भाषण केलं आणि याच भाषणातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. इतर विद्यार्थ्यांसोबत केलेल्या या भाषणाचा व्हिडीओ त्याच्याच गावातील राम या मुलाने केलं. हेच भाषण त्यांनी गावातल्या एका व्हाट्सअॅप ग्रुपवर टाकलं आणि पुढे सोशल मीडियावर लोकशाहीची मोकळी व्याख्या आपल्याला ऐकायला मिळाली. 


शाळेत खोड्या करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कार्तिक गुरुजीं देखील लाडका आहे. आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी गुरूजींनी एक स्क्रिप्ट सुचली. तिचं भाषणात रूपांतर झालं आणि याच्या पाठांतराची जबाबदारी भाषणाला न्याय देऊ शकेल अशा गुणी विद्यार्थी असलेल्या कार्तिकवर आली आणि ती जबाबदारी त्यांनी सार्थ करून दाखवली, असे शिक्षक भारत मस्के यांनी सांगितले. 


कार्तिकला जन्मापासूनच डोळ्यांची समस्या आहे. त्याला दूरचं दिसत नाही म्हणून तो गुरुजींच्या अगदी फळ्याजवळ असतो. त्यामुळे त्याचा ज्ञानार्जनाचं कार्य गुरुजनांच्या जवळ बसून होतं. त्यामुळे त्याच्या तल्लक बुद्धीला पुस्तकाची आणि आत्मविश्वासाची जोड मिळाल्याने त्याने ही किमया साध्य केली, असे कार्किकचे वडील जालंदर वजीर यांनी सांगितले.  


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही पुस्तकी व्याख्या आपल्या दैनंदिन आयुष्याशी जुळवून तिला आपल्या शब्दात मांडणारा हा छोटा अब्रहम लिंकन या निमित्ताने चांगल्यात चर्चेत आलाय. त्याच्या भाषणाने आपल्या भोवती निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठीच एबीपी माझाच्या प्रेक्षकांना बंधुतुल्य लोकशाही शिकवणारा गुरु आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने  मांडणाऱ्या कार्तिकसोबत एबीपी माझाने संवाद साधला.   


पाहा व्हिडीओ