जालना : जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री  रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)  यांच्या जवखेडा गावामध्ये  एका कुंभार समाजाच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे.  घर पाडल्या प्रकरणी दानवे यांच्यावर आरोप होऊ लागलेत, पीडित कुटुंबाने रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा खुर्द या रावसाहेब दानवे यांच्या गावांमध्ये बाबूलाल संत्रे यांच्या मालकीच्या घरात 22 मे च्या मध्यरात्री अज्ञात आरोपींनी मारहाण करून घर पाडल्याची घटना घडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सदस्य असलेल्या गजानन संत्रे आणि त्यांच्या भावंडांनी व्हिडिओ करून सोशल मीडियावर झालेल्या प्रकारची माहिती दिली. या व्हिडीओमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून हल्ला करून घर पाडल्याचा  आरोप केला आहे.  याप्रकरणी दुसऱ्या दिवशी हसनाबाद पोलीस ठाण्यात सात ते आठ अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


भोकरदन -जवखेडा देऊळगाव राजा राष्ट्रीय महामार्ग -753 साठी 2023 मध्ये भूसंपादनाचे काम झाले असून  यात  जवळपास 22 मालमत्तांचा समावेश आहे. गावात बाबुलाल संत्रे यांच्या मालकीच 148.22 चौरस मीटर मालकीचे घर होते. पत्रे आणि लाकडी बांधकामाच्या या घरांपैकी 104 चौरस मीटरचे रस्त्यासाठी संपादन करण्यात आले आहे. यावर त्यांना शंभर टक्के दिलासा रक्कम म्हणून 13 लाख 99 हजार 234 रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोबादला म्हणून दिले आहेत. उर्वरित 44.22 चौरस मीटरचे बांधकाम अज्ञात व्यक्तीने पाडल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.


जमीन बळकवण्याचा आरोप 


संत्रे कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये राजकीय आरोप देखील होऊ लागले आहेत. काल घटनास्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल भेट देऊन कुटुंबाचं सांत्वन केलं. रावसाहेब दानवे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर जमीन बळकवण्याचा आरोप  केला. दरम्यान आपण सभागृहात या  कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा विषय लावून धरणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय, असे वडेट्टीवार म्हणाले. 


घटनेच्या दिवशी त्या रात्री नेमकं काय घडलं?


 विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर किंवा संबंधित घटनेवर रावसाहेब दानवे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या FIR नुसार घटनेतील अज्ञात आरोपी कोण आणि घटनेच्या दिवशी त्या रात्री नेमकं काय घडलं याचा संशय पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.  


हे ही वाचा :


जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे