जालना : पुणे अपघात प्रकरणाची थेट वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दखल घेत ससून रुग्णालयातील (Hospital) संबंधितांवर आज मोठी कारवाई केली. मात्र, एखाद्या रुग्णालयात डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या या गैरप्रकारावरुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. देवासमान मानून डॉक्टरांना (Doctor) समाजात मानाचं स्थान दिलं जातं, पण डॉक्टरांकडूनच पैशासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वावर शिंतोंडे उडवण्याचं आणि वैद्यकीय क्षेत्राला काळिमा लावण्याचं काम झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुणे अपघातात डॉ. अजय तावरेने ब्लड सॅम्पल बदललेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, त्यांचे निलंबनही करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.  


रक्ताचे सॅम्पल चेंज करणं यासारखा मोठा गुन्हा नाही. डॉक्टराना लोक देव मानतात आणि अशा डॉक्टरांनी जर का कुणाच्या दबावाला बळी पडून किंवा काही देवाण-घेवाण करून असे सॅम्पल चेंज केले असतील तर हा मोठा गुन्हा आहे. एखाद्या धनिक व्यक्तीला वाचवण्याचे काम डॉक्टरांकडून होत असेल तर अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीच राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पुणे अपघात प्रकरणातील आरोपी डॉक्टरसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना आरोपीवर कडक शिक्षेची मागणी केली आहे. त्यामुळे, सरकार केवळ निलंबनावरच थांबणार आहे की, आणखी मोठी कारवाई करणार, हे पाहावे लागेल. 


पुणे अपघात प्रकरणात वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी तिन्ही आरोपींचे निलंबन केले आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आरोपी अजय तावरेंसह, हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील ससून रुग्णालयात गेल्या काही महिन्यात सातत्याने गैरप्रकार होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक डोळेझाक असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होत असून चांगल्या डॉक्टरांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.  


फळबागांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्या


जालना जिल्ह्यातील मोसंबीसह सर्व फळ पिकांना दुष्काळी परिस्थितीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत असून शेतकरी पाण्याअभावी मोसंबी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा तोडून टाकत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील फळबागांना हेक्टरी एक लाख रुपयांची तात्काळ मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आज त्यांनी आपल्या मुख्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असून सरकारमध्ये थोडी जरी संवेदना असेल तर त्यांनी तात्काळ मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.