जालना : जिल्ह्यातील (Jalna news) जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी या वृद्धाच्या अंगावर रात्री झोपेतच अॅसिड टाकल्याचे समोर आले. गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीरंग हरीबा शेजूळ (वय 85 वर्षे, म्हसरूळ, ता.जाफराबाद) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटकही करण्यात आली आहे. 


या घटनेसंदर्भात उत्तम श्रीरंग शेजूळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील श्रीरंग शेजूळ नेहमीप्रमाणे 1 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात झोपले होते. दरम्यान यावेळी उत्तम शेजूळ हे गावातील सांस्कृतिक सभागृहात झोपण्यासाठी गेलो होते. मात्र, रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना आपल्या वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी आपल्या चुलतभावाला सोबत घेऊन वडिलांकडे धाव घेतली. मात्र, यावेळी श्रीरंग शेजूळ यांच्या अंगावर कसलेतरी द्रव टाकलेले त्यांना दिसले. अंग भाजत असल्याने श्रीरंग शेजूळ ओरडत होते. आजूबाजूला पाहिले असता कुणीच दिसून आले नाही. त्रास अधिक होत असल्याने उत्तम शेजूळ यांनी आपल्या वडिलांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, सोमवारी श्रीरंग शेजूळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


आरोपीच्या घरात सापडले अॅसिड


या प्रकरणी गावातील संशयित नंदू किशोर शेजूळने तीन महिन्यांपूर्वी आमच्या कुटुंबाला धमकी दिली होती. तसेच नंदू भटकर साबळे (रा. म्हसरूळ) यानेही यापूर्वी वडिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं उत्तम शेजूळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या दोघांनीच आपल्या वडिलांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकले असल्याचे उत्तम शेजूळ यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तापसाचे चक्र फिरवत संशयित नंदू किशोर शेजूळ याला ताब्यात घेतले असून, त्याच्या घरातून अॅसिड जप्त केले आहे. तर त्याच्या विरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला, जन्मदात्या मुलानेच बापाचा घात केला