परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेला वादातून जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यावर मृतदेह परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पात्रात फेकून देण्यात आला होता. मात्र, परभणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत मयत व्यक्तीची ओळख पटवून, हत्या करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुंजा एकनाथ कटारे असे मयत व्यक्तीचे नाव असून, अशोक मुंजा कटारे असे आरोपी मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे, परभणी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून सदर प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्याची कामगिरी अवघ्या सहा तासांत पूर्ण केली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात रविवारी  एका पुरुषाचा अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सडल्यामुळे परिसरात वास सुटला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवितांना त्याच्या हातावर गोंदलेल्या यात मयत व्यक्तीचे नाव मुंजा एकनाथ कटारे असल्याचे पोलिसांना कळाले. त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले असता मयत हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळाले. 


क्षुल्लक कारणावरून केली हत्या...


मयत व्यक्तीची ओळख पटल्याने परभणी पोलिसांनी बीडच्या माजलगाव परिसरातील दिंद्रुड येथे जाऊन चौकशी केली असता मुंजा कटारे यांचा घातपात करून त्यांना दिंद्रुड परिसरात जिवे मारून मृतदेह दैठणा परिसरात फेकल्याची त्यांना माहिती मिळाली. यात मयताचा मुलगा अशोक कटारे याचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत अशोक कटारे याने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून वडिलांची हत्या केल्याचं त्याने म्हटले. तसेच, हत्या केल्यावर संगम पाटी ते दिंद्रुड जाणाऱ्या रोडवर जिवे मारून त्यांचा मृतदेह दैठणा हद्दीतील नदी पात्रात फेकल्याचे देखील त्याने सांगितले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मृतदेह बीडहून परभणीत आणला...


क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात अशोकने वडिलांचा खून केला. त्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्याने वडिलांचा मृतदेह दिंद्रुड गावातून पाथरीमार्गे परभणीत आणला. विशेष म्हणजे पाथरीत वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याने प्रयत्न केला होता. परंतु, त्याठिकाणी गर्दी असल्याने त्याने मृतदेह गंगाखेड-परभणी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुलाखाली टाकल्याची कबुली तपासाअंती दिली.


इतर महत्वाच्या बातम्या ; 


Parbhani Crime : धक्कादायक! पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीला संपवले, हत्येनंतर मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला