जालना : गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अखेर आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपले उपोषण मागे घेतले आहे. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी आपले उपोषण संपवलं आहे. मात्र, याचवेळी मनोज जरांगेंच्या मागण्या काय होत्या? अन् कोणत्या मागण्या मान्य झाल्या? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.
मनोज जरांगे यांची मागण्या?
- निजाम राजवटीत वंशावळीमध्ये नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं हा शासनाने 7 सप्टेंबरला काढलेल्या GR मध्ये दुरुस्ती करून सरसकट सर्वाना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
- अंतरवाली गावातील आंदोलक ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.
- लाठीमार करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
कोणत्या मागण्या मान्य झाल्या?
- अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक डीवायएसपी,एक एपीआय निलंबित केले आहे.
- या शिवाय गावातील नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. तसेच उपोषणास्थळी गुन्हे मागे घेण्याबाबत त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
- सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली असून, महिनाभरात या समितीला अहवाल द्यायचा असून सरकार एक महिन्यांमध्ये जरांगेच्या मागणी विषयी निर्णय घेईल असे आश्वासन दिले आहेत.
17 दिवसांनी उपोषण मागे?
29 ऑगस्टपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी तब्बल 17 दिवसांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांचे उपोषण सुरु होते. दरम्यान त्यांचे उपोषण सुरु असतानाच पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्यामुळे याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळाले. मात्र, लाठीमारच्या घटनेनंतर देखील जरांगे आपल्या उपोषणावर कायम होते. शेवटी सरकारच्या शिष्टमंडळात आणि जरांगे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर 17 दिवसांनी जरांगे यांनी मुख्यंमत्री यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
उपोषण सुरूच राहणार?
सरकारने एक महिन्याचा वेळ मागून घेतल्याने आपण त्यांना तो वेळ दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आमरण उपोषण मागे घेत आहे. मात्र, असे असलं तरीही एक महिना आपले साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. तसेच, राज्यातील वेगवेगळ्या भागात देखील साखळी उपोषण केले जाणार आहे. त्यामुळे आपण एक महिन्याची वाट पाहणार असून, त्यानंतर मात्र आक्रमक भूमिका घेण्याचं यापूर्वीच जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
आंदोलनाची धग कायम, बस पेटवल्याने नांदेड जिल्ह्यात सकाळपासून अंतर्गत बससेवा बंद; प्रवाशांचे हाल