Jalgaon News : गावातील महत्त्वाचे विषय मार्गी लावण्याचं काम सरपंच (Sarpanch) करतात. गावातील भांडण-तंटा मिटवण्यात संरपंचाची भूमिका महत्त्वाची असते. परंतु जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील वडोदा गावाच्या महिला सरपंचाने मात्र याला हरताळ फासला. ग्रामपंचायतीच्या बैठकीत या महिला सरपंचाने उपसरपंचाच्या मुलाला मोबाईल फोन (Mobile Phone) फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसात परस्पर तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वडोदा गावाच्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या गावच्या सरपंच आणि उपसरपंचपदी महिला आहेत. बैठकीत सरपंच महिलेने उपसरपंच महिलेच्या मुलाला मोबाईल फेकून मारला. विशेष म्हणजे सरपंच महिलेने फेकून मारलेला मोबाईल फोन हा उपसरपंच महिलेलाच असल्याचं समोर आलं. 


ग्रामपंचायतीची बैठक सुरु असताना सरपंच स्वप्ना खिरोळकर आणि उपसरपंच रंजना कोथलकर या दोन्ही महिलेमध्ये वाद झाला. यावेळी उपसरपंच महिलेचे मुले बैठकीचं मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण करत असल्याचं सरपंचांना समजलं. याचा राग आल्याने सरपंच खिरोळकर यांनी शूटिंग करणाऱ्या उपसरपंच महिलेच्या मुलाला तिचाच मोबाईल फोन फेकून मारला, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.


या प्रकरणी उपसरपंच महिलेच्या तक्रारीवरून सरपंच महिलेविरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सरपंच महिलेने दिलेला तक्रारीवरून उपसरपंच आणि तिच्या दोन्ही मुलांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंढे यांनी सांगितले आहे. घटनेचे नेमके कारण यासह विविध बाबींचा पोलीस तपास करत असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.


दरम्यान भर ग्रामपंचायत बैठकीतील सरपंच-उपसरपंच यांच्यात झालेल्या या गदारोळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या