Jalgaon News : शिवसेनेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटात आता आरोग्यावरुनही राजकारण केले जात असल्याचं जळगावमध्ये (Jalgaon) पाहायला मिळत आहे. शहरातील आरोग्य सेवेसाठी जिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेली रुग्णवाहिका (Ambulance) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेच्या ताब्यातून परत मागून घेतल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटातून आरोग्य क्षेत्रातही राजकारण केले जात असल्याचा आरोप आता उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे.
शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने शहरातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली होती. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र तदनंतर शिवसेनेमध्ये बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी दोन गट निर्माण झाल्याचं चित्र राज्यात निर्माण झाले. या दोन्ही गटातील वादाचा परिणाम आता शहरी आणि ग्रामीण भागातही थेट दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
माजी कॅबिनेटमंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटात सामील झाले. शिवाय वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे समर्थन केलं. यानंतर गुलाबराव यांच्या हस्ते शिवसेनेला लोकार्पण करण्यात आलेली रुग्णवाहिका त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाकडून परत मागून घेतली. प्रताप पाटील यांनी उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर यांना फोन करुन रुग्णवाहिका पाठवून देण्याची सूचना केली. त्याचा फोन येताच काही तासातच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका रवाना केली. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात ही राजकारण केले जात असल्याचं उघड झालं आहे.
रुग्णवाहिका परत मागून घेतल्याने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष असल्याचं पाहायला मिळत होते. याच रोषातून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज दोन रुग्णवाहिका आरोग्य सेवेसाठी दान करुन एकप्रकारे आपली जिद्द पूर्ण केली असल्याचं या पाहायला मिळाले.