Gulabrao Patil on Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागतंय, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला शिंदे गटात सहभागी झालेले जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील आमदार आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. आता संपूर्ण राज्यात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती. आज आमच्या उद्धवसाहेबांना शाखेवर जावं लागतंय, विनामास्क जावं लागतंय, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. मला असं वाटतं हेच जर मागील काळात केलं असतं तर जी आमची शिवसेना मजबूत आहे ती आणखी मजबूत झाली असती. बाळासाहेबांची ही शिवसेना अधिक मजबूत व्हावी म्हणून आम्ही हा उठाव केला आहे. या उठावाच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करु, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा
आदित्य ठाकरे सध्या शिव संवाद यात्रा करत आहेत. या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आज ते नाशिक जिल्ह्यात असून मनमाडमध्ये ते शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. सरकार कोसळल्यापासून आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईसह राज्यभरातील शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. मुंबईतील विविध शिवसेनेच्या शाखांना भेट देऊन ते शिवसैनिकांना बळ देत आहेत.
शिंदे गटाचं बंड आणि सरकार कोसळलं
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी करुन नवा गट बनवल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. त्यानंतर शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आधी आमदार, मग खासदार यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिवाय राज्याच्या विविध जिल्ह्यातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेनेच्या अस्तित्त्वावरच प्रश्न उभे राहत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे विविध शिवसेनेच्या शाखांमध्ये जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.
युवासेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शिंदे गटामध्ये प्रवेश
युवासेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना युवासेना पक्षश्रेष्ठीवर नाराजी व्यक्त करत युवासेनेच्या विविध पदाचे राजीनामे दिले. माजी मंत्री आणि शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील युवासेना महानगरप्रमुख स्वप्निल परदेशी यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
संबंधित बातमी