Maharashtra Politics : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 'शिवसंवाद'च्या निमित्ताने काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना आता दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून त्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. 


संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे जवळपास महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी ठाणे जिल्ह्यातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. ठाण्यात त्यांचे उत्साहात स्वागत झाले. आदित्य यांच्या दौऱ्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभत असून स्थानिक शिवसैनिक शिवसेनेसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील वातावरण शिवसेनामय झालेलं असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून त्याचे नियोजन सुरू झाले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. 


केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग 


आम्ही देशासमोर उभे असलेले प्रश्न विचारत आहोत. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेकांना नोटिसा आल्या आहेत. देश हितासाठी बोलत असल्याने सर्वांवर कारवाई सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या दबावात काम करत आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीने केलेली चौकशी याच कारणातून झाली असल्याचे राऊत यांनी म्हटले. विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना धमकावलं जात आहे. या दडपशाहीचा आम्ही सामना करू असा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला. 


द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अपेक्षा


देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असणार असून त्यांच आम्ही अभिनंदन करत आहोत. ही निवडणूक त्या विजयी होतील हे स्पष्ट होते. शिवसेनेनेदेखील त्यांना मते दिली आहेत. त्यांच्या विजयात आमचाही खारीचा वाटा असल्याचे राऊत यांनी सांगितले. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या पार्श्वभूमीतून आल्या आहेत. त्यांच्या विजयाचा आम्हाला आनंद झाला आहे. देशाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे राऊत यांनी सांगितले.