Jalgaon News : जळगाव (Jalgaon) तालुक्यातील चिंचोली येथे शिवसेनेच्या मेळाव्यात (Shiv Sena Melava) एका मद्यपी शेतकऱ्याने थेट भाषण करणाऱ्या संपर्क मंत्री संजय सावंत (Sanjay Sawant) यांना रोखले. त्यानंतर त्यांच्या हातातून माईक घेत जोरदार बॅटिंग करत आपल्या भाषणातून या शेतकऱ्याने बंडखोर आमदार आणि मंत्र्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्याने केलेल्या विविध डायलॉगचा वापरही लक्षवेधी ठरला. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...म्हणत मजा मारणाऱ्या बंडखोरांवर या शेतकऱ्याने अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली. त्याच्या डायलॉगबाजीसह टीकेवर संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह उपस्थितांनी दाद दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
चिंचोली इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. संपर्कप्रमुख संजय सावंत भाषणासाठी उठले. त्यांनी भाषण सुरु केले. काही मिनिटात उपस्थितांमधून एक मद्यपी शेतकरी उठला. बंडखोर आमदार धमकी देत असल्याचे संजय सावंत यांनी आपल्या भाषणात म्हटले. जर शेतकऱ्याला जर धमकी आली, तर शेतकरी कोणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत या मद्यपी शेतकऱ्याने सावंत यांचे भाषण थांबवत थेट त्यांच्या हातातील माईक घेतला आणि आपल्या भावना मांडण्यात सुरुवात केली. सावंत यांनीही त्याला रोखले नाही आणि भाषण करण्यास सांगितले.
शेतकऱ्याच्या जीवावर निवडून येतात...
बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार यांना उद्देशून तो शेतकरी म्हणाला की, "शेतकऱ्याच्या जीवावर निवडून येतात. निवडून आल्यावर हे करु ते करु करु, अशी मोठमोठी आश्वासने देतात मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. आमच्या गावात पूल नाही म्हणून शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे व्यथा मांडली. मात्र ते नुसते भटकून राहिले, मात्र पूल झाला नाही.
आमदारसाहेब पैशांचे लालची राहू, अन् गुवाहाटीले जावू...
शिवसेनेसोबत बंड केलेल्या आमदारांवर या शेतकऱ्याने डायलॉगबाजी करत जोरदार टीका केली. आपल्याला पहिलेच भाजपसोबत जायला पाहिजे होते हे या आमदारांना तेव्हा समजंल नाही. आता निधी दिला नाही म्हणून सांगत भुलथापा मारताहेत, अन् सर्वांची दिशाभूल करताहेत, आणि गुवाहटी फिरताहेत, मजा मारत फिरत आहेत, नागरिकांना वेडे समजता का असा सवालही त्याने उपस्थित केला.
काय हाटील..काय झाडी..अन्...
एकीकडे शेतकरी दुबार पेरण्या करतोय, त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, ते विमानाने गुवाहाटी काय, गोवा काय फिरुन राहिले. काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले. यांना मजा मारायला निवडून दिले का, या शब्दात शेतकऱ्याने बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. एक म्हणतो मी मुख्यमंत्री अन् दुसरा म्हणतो मी उपमुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी त्याग केला.. सर्वांनी त्यांच्याशी पाठीशी राहायला पाहिजे होते, असेही उपदेशाचे डोसही त्याने बंडखोरांना पाजले. जे शिवसेनेतून फुटले त्यांना उद्देशून जो फूट गया वह टूट गया...हा डायलॉग मारुन भाषण संपवले. या मद्यपी शेतकऱ्याची गावात एकच चर्चा होती. भाषणावेळी त्याच्या डायलॉगबाजीने उपस्थित संपर्कप्रमुख, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते चांगलेच लोटपोट झाल्याचे तसेच सर्वांनी त्याला टाळ्या वाजवून त्याला दाद दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले.