(Source: Poll of Polls)
Jalgaon News : जळगावातील मण्यारखेडा तलावात मृत माशांचा खच, दुषित पाण्यामुळे जैवविविधतेला धोका
Jalgaon News : मण्यारखेडा तलावात हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रसायनयुक्त पाणी तलावात सोडले जात असल्याने ही घटना घडल्याचा ग्रामस्थांना संशय आहे.
जळगाव : जिल्ह्यातील मण्यारखेडा तलावात (Manyarkheda Lake) हजारो मासे (Fish) मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रसायनयुक्त पाणी तलावात सोडले जात असल्याने ही घटना घडल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. दुषित पाण्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.
केमिकल कंपन्यासह (Chemical Companies) सांडपाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी दूषित होऊन तलावातील तब्बल 50 ते 60 क्विंटल पेक्षा जास्त माशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी तलावावर मासेमारी करण्यासाठी मच्छीमार आल्यावर ही धक्कादायक घटना समोर आली. यात माशांबरोबरच इतरही तलावातील जीवजंतू देखील मृत झाले आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मच्छीमारांनी उदरनिर्वाह करायचा तरी कसा?
मण्यारखेडा तलावापासून काही किलोमीटर अंतरावर एमआयडीसी असून या एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांचा रसायनयुक्त पाणी हे तलावात सोडलं जात असल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या तलावावर मासेमारी करून तब्बल 15 ते 20 मच्छीमार हे आपला उदरनिर्वाह करतात. मात्र तलावातील संपूर्ण मासे मृत झाल्यामुळे आता उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न असून भरपाई मिळण्याची मागणी मच्छीमार सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.
घटनेची चौकशी करण्याची मागणी
दोन वर्षांपूर्वीसुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार मण्यारखेडा तलावात घडला होता. याबाबत तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रदूषण मंडळ अथवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आता पुन्हा तलावात मृत माशांचा खच पडल्याची घटना घडली आहे. या घटनेची चौकशी करून ज्या कंपन्यांचे पाणी तलावात सोडण्यात येते त्यांच्यावर कारवाई करावी तसेच दूषित पाणी दुसऱ्या इतरत्र ठिकाणी सोडलं जावं, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik News : नाशिकच्या वालदेवी नदीत मृत माशांचा खच, प्रदूषण उठलं जलचरांच्या जीवावर