Supriya Sule : आज त्यांनी पक्ष फोडला उद्या तुमच्या घरात येऊन नुकसान करतील. सरकार घाबरले असल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सरकारवर केली आहे. तर जनता हुशार असून निवडणूक पुढे धकलली तरी पुढचे सरकार आमचे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे (NCP Sharad Pawar Group) जळगावात (Jalgaon) झालेल्या महिला मेळाव्यातून त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जळगाव आणि पवार साहेब यांचे प्रेमाचे संबध राहिले आहेत. वेगळी ओळख जळगावची राहिली आहे. बालवाडीमध्ये महिलांना बोलवले आहे. कार्यक्रमाला आले नाही तर तुम्हाला मदत मिळणार नसल्याचे मेसेज महिलांना आले आहेत, असे महिलांनी सांगितले. महिलांना निधी देता याबाबत आभार मानते. चांगल्या कामाचं आपण नेहमीच कौतुक केले आहे. पण, लाल साड्या घालून यायला सांगितले जात आहे. दडपशाही करत असेल तर ती मोडून काढा, ज्याला पाहिजे त्याला मतदान करा. मात्र दडपशाही सरकार हद्दपार करण्याची ही वेळ आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केला.
लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या
त्या पुढे म्हणाल्या की, मी येथे मत मागण्यासाठी आली आहे. पण दडपशाही करून नाही तर प्रेमाने, कष्ट करणाऱ्याला मदत म्हणजे सेवा आहे. लाडकी बहीण योजना म्हणतात आणि लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या. याचा मला चांगला अनुभव आहे. मी नात्यात अडकत नाही. नात वेगळे आणि काम वेगळे आहे. अतिशय शांतपणे आणि संविधानाच्या मार्गाने आपल्याला आपले काम करायचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
सुप्रिया सुळेंचे महिलेला आश्वासन
शेतीवर कर लावला आहे. आपला सरकार येईल त्यावेळी शेतीशी निगडीत ज्या वस्तूंवर कर असेल तो लावण्यात येणार नाही. शेतकरी खड्यात जात आहे, असे बोलत असतानाच उपस्थित महिलेने सुप्रिया सुळे यांच्यापुढे व्यथा मांडल्या. दारू बंदी करा, शेतकरी शून्यात जात आहे. सोयाबीनला भाव द्या, सगळ्या गोष्टी महाग, मात्र शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव नाही. पंधराशे रुपयांनी काय पोट भरणार आहे का? असे महिलेने म्हटले. तसेच सोयाबीनला दहा हजार आणि कपाशीला बारा हजार भाव देण्याची मागणी महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. यावर तुमची मागणी लोकसभेत करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी महिलेला आश्वासन दिले.
सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढे ढकलतंय
तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर गाव वस्तीवर दारू बंदी कार्यक्रम राबविणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तर अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवून मिळाले नाही तर आपण उपोषण करणारही त्यांनी यावेळी सांगितले. हे सरकार फक्त पक्ष फोडणे आणि मतांचे राजकारण करत आहेत. या विरोधात आपण राज्यभर लढाई लढत आहेत. माझ्यावर अन्याय झाला आहे. तुमच्यावरही होत आहे. आज त्यांनी पक्ष फोडला उद्या तुमच्या घरात येऊन नुकसान करतील. सरकार घाबरले असल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहे. मात्र जनता हुशार आहे. निवडणूक पुढे धकलली तरी पुढचे आमचे सरकार येईल, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केला. लोकसभेत पूर्ण यश मिळाले नसले तरी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
आणखी वाचा
'एकातरी लाडकी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवा'; सुप्रिया सुळेंचं आव्हान, शेअर केला धक्कादायक फोटो