Supriya Sule On Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. मात्र याचदरम्यान शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम आज पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमाआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?


सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी मोबाईवरील एक मेसेजचा फोटो शेअर करत एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवा, असं आव्हान दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत... बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार... अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.






सुप्रिया सुळेंनी केलेल्या ट्विटच्या फोटोमध्ये नेमकं काय म्हटलंय?


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे approved मेसेज आला आहे त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे सर्वांनी येणे आवश्यक आहे ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल, असं सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे.


आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ-


राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे. 14 ऑगस्टच्या रात्री साधारण 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले. म्हणजेच सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 


संबंधित बातमी:


लाडकी बहीण योजनेचे लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!