जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून (NCP Sharad Pawar Group) पुन्हा एकदा भाजपमध्ये (BJP) घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. खडसेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत जाहीर घोषणाही केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांची भाजप घरवापसी होईल, असे बोलले जात होते. मात्र अजूनहीदेखील त्यांचा पक्ष प्रवेश रखडलेलाच आहे. त्यातच आता एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांचा फोटो शरद पवार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बॅनरवर झळकला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादी शरद पवार राहणार का? असा चर्चांना आता उधाण आले आहे. आज एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर शरद पवार, मुलगी रोहिणी खडसे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे फोटो झळकले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बोदवड उत्पन्न बाजार समिती शुभेच्छा बॅनरची सध्या जळगावमध्ये चर्चा होत आहे.
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह
एकनाथ खडसेंनी मध्यंतरी भाजप पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. भाजपच्या केंद्र नेतृत्वाला भेटून एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडला असताना थेट एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकल्याने पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आता एकनाथ खडसे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाल्या रक्षा खडसे ?
एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षात आहेत. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला का वेळ लागत आहे, असे मुद्दे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत. याबाबत रक्षा खडसे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, नाथाभाऊंनी लोकसभेला मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी काम केले. भाजपामध्ये येण्याची इच्छा ही व्यक्त केली. तो नाथाभाऊंचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांनाच याबाबत विचारणे अधिक चांगले, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे.
गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार का? हे तुम्हीच त्यांना विचारा असं म्हणत त्यांनी विषय टाळला. खडसेंची डायरेक्ट वरती लाईन आहे असा टोला लगावत, त्यांनी राजीनामा दिला आहे का किंवा ते भाजपमध्ये येणार आहेत का? हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, असं महाजन म्हणाले. सुप्रिया सुळे यांना माहित नाही, जयंत पाटलांना माहित नाही, शरद पवारांनाही माहित नाही. त्यापेक्षा त्यांनाच जाऊन विचारा त्यांचं स्टेटस नक्की काय? असं म्हणत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला होता.
आणखी वाचा