Raver Lok Sabha Election 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी आमदार संतोष चौधरी (Santosh Chaudhary) यांना उमेदवारी मिळेल, असे संकेत होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करत उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे संतोष चौधरी यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा दिला आहे. येत्या २४ तारखेला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 


माजी आमदार संतोष चौधरी यांची उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर संतोष चौधरी यांनी आज आपल्या समर्थकांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्या भुसावळ मतदार संघात निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. 


24 तारखेला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार


यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी गेल्या पंधरा वर्षापासून आपण पक्षाशी एकनिष्ठ राहून सुद्धा आपल्यावर अन्याय केला जात आहे. यावेळी सुद्धा असाच अन्याय करण्यात आला असून या संदर्भात आपण पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. येत्या 24 तारखेला आपण लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


एकनाथ खडसे यांनी पक्षाला धोका दिला 


मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी जाहीर केलेलं नाही. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संतोष चौधरी यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावरही आगपाखड केली आहे. ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी पक्षाला धोका दिला आहे. त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यावर काय जादू केली माहीत नाही. मात्र त्यांनी आपल्याला आणि पक्षाला धोका दिला आहे. पक्षाने त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पक्षाच्या बाहेर काढावे अशी मागणी आपण शरद पवार यांच्याकडे करणार आहोत. 


संतोष चौधरींचा मोठा गौप्यस्फोट


त्याचबरोबर ज्या मंत्र्यांनी खडसे यांच्या 137 कोटी दंडाच्या रकमेला स्टे दिला. त्या मंत्र्यांनाही भेटणार असून तो स्टे रद्द करण्यासाठी आपण अर्ज करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  आपण लवकरच मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी जाणार असून चार पक्षांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या ऑफर आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोट देखील संतोष चौधरी यांनी केला आहे. 


आणखी वाचा 


Jalgaon News: निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश