Jalgaon News : कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांसह इतर शेतमाल पिकवणारा शेतकरी यंदाच्या वर्षी संकटात सापडला आहे. सुरुवातीला शेती मालाला भाव नाही. तर नंतरच्या काळात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अशा स्थितीतही शेतकरी आपल्या पिकाला भाव येईल म्हणून आशेवर आहे. जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या व्यथाकवितेतून मांडल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे.
काही दिवसांपूर्वी जालना (Jalna) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा 'आलं धोक्याच सरकार' हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कापूस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस पाडवा होऊन गेला तरी घरातच आहे. भाव वाढेल या अपेक्षेने घरातच साठवलेला कापूस आता शेतकऱ्यांसाठी संकट बनला आहे. कारण, बाजारात विकावा तर भाव नाही अन् घरी ठेवावा तर नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येला जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शेतकरी राहूल चव्हाण यांनी लोकगीताच्या माध्यमातून वाचा फोडली.
जामनेर (Jamner) तालुक्यातील नेरी येथे कापसाला भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 'रास्ता रोको आंदोलन' (Protest) केले. या आंदोलनानंतर एका शेतकऱ्याने गाण्यातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी राहूल चव्हाण यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अन् पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जळगाव जिल्ह्यासह कापूस उत्पादक पट्ट्यात या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. 'माझ्या गावाकडं चल माझ्या दोसतां' असे या गाण्याचे बोल असून शेतकऱ्याची व्यथा सरकार मायबाप जाणून घेणार का असा सवाल चव्हाण यांनी गाण्यातून मांडला आहे.
कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या जामनेरातील नेरी येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. सवतखेडा येथील शेतकरी संजय मोगरे यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करत हे आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनानंतर नेरी येथे शेतकऱ्यांची सभा झाली. यावेळी सततच्या संकटांमुळे शेतकरी नुकसानात आहे. मात्र, शेतकऱ्याकडे त्याच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. शेतकरी दिवसभर ऊन असो की पाऊस असो यात अहोरात्र काम करुन पिकवतो, मात्र त्याच्या मालाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे संकटांनंतर नुकसान भरपाई मिळत नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा राहूल चव्हाण या तरुण शेतकऱ्याने गीतातून मांडल्या. गीत ऐकताना उपस्थित सर्व सुन्न झाले होते.
संबंधित बातम्या