Jalgaon Gulabrao Patil : संजय राऊत (Sanjay Raut) यांना माझे चॅलेंज आहे. याप्रकरणाची तीन महिन्यात चौकशी तुम्ही करा. मी बॅन्ड लिहून देतो. जर चौकशीत दोषी आढळलो तर मी एक मिनिटही मंत्री राहाणार नाही. नाहीतर त्यांनी संजय राऊत यांनी खासदारकीचे राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद चिघळण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे. 


आज जळगावच्या (Jalgaon) पाचोरा शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. दुसरीकडे संजय राऊत (Sanjay Raut) आणि गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार घमासान युद्ध सुरु आहे. दोन दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांववर गुलाबराव पाटील उत्तर दिले आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनी अवकातीत राहावं, हा आमच्या तुकड्यावर मोठा झालेला संजय राऊत याने जास्त बोलू नये. संजय राऊत हा नौटंकी माणूस असून ज्याला भटकलेला आत्मा म्हणतात अशा पद्धतीचा माणूस आहे. त्यामुळे सभेमध्ये संजय राऊत यांनी वाचकपणाची भाषा करू नये. नाहीतर आमचे कार्यकर्ते सभेत घुसतील, असा इशारा पुन्हा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. 


खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल 400 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तर या घोटाळ्याचे सर्व कागदपत्र आपल्याकडे असल्याचं देखील राऊत यांनी म्हटले आहे. यावर गुलाबराव पाटील यांनीकागदपत्रे समोर ठेऊन  सडेतोड उत्तरे दिले आहे. ते म्हणाले कि, कोरोना काळात जळगाव जिल्ह्यात 190 कोटी खर्च करावे असे शासनाचे आदेश होते. त्याच्यापैकी आम्ही 121 कोटीला मान्यता केली आणि 90 कोटी वितरित केले. आणि तीन वर्षात फक्त 81 कोटी रुपये खर्च झाले. ज्या ठिकाणी तीन वर्षात 81 कोटी रुपये खर्च होत आहेत, त्या ठिकाणी 400 कोटीचा घोटाळा कसा होईल? असा उलट सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. 


एक मिनिटात राजीनामा देतो... 


गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, संजय राऊत यांना माझे चॅलेंज आहे. या प्रकरणाची तीन महिन्यात चौकशी तुम्ही करा. मी बॅन्ड लिहून देतो. जर चौकशीत दोषी आढळलो तर मी एक मिनिटही मंत्री राहाणार नाही. नाहीतर त्यांनी संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. यानंतर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर थेट आरोप करत म्हणाले की, 'उलटा चोर कोतवाल को दाटे', तुम्ही पुण्यात आणि ठाण्याचे व्यवहार कसे केले आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे कावळ्याच्या सापाने कुठे गाय मरते का..? तुम्ही चोर आहेत म्हणूनच तीन महिने जेलमध्ये गेलात, असेही पाटील म्हणाले. 'नाक खाजे आणि नकटी खिजे' अशी म्हण संजय राऊत यांच्यासाठी वापरलेली आहे. हा माणूस कोणत्याही गोष्टीला आपल्या अंगावर घेतो आणि यांनी शिवसेना पक्षाला वेड केला आहे असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.