Jalgaon News : वयाच्या शंभरीनंतर जिवंत राहणं हेच खरं तर आताच्या काळातील आश्चर्य आहे. या वयात कोणताही आजार असला तरी डॉक्टर शस्त्रक्रिया करत नाहीत. कारण या वयात रुग्णाचे शरीर पूर्णपणे थकलेले असल्याने रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. मात्र वयाच्या 102 वर्ष पार केलेल्या जळगावातील (Jalgaon) तुळसाबाई हटकर याला अपवाद ठरल्या आहेत. 102 वर्षाच्या तुळसाबाईंवर ब्रेस्ट कॅन्सरची शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. 


वयाच्या शंभरीनंतर कोणत्याही रुग्णावर जळगावमधील ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया (Operation) असून, राज्यातील ही अतिशय दुर्मिळ घटना असल्याचं मानलं जात आहे. दिवस रात्र शेतीत काबाड कष्ट करून बळकट असलेले शरीर आणि या वयातही त्यांची जगण्याची जिद्द पाहता जळगावमधील कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी त्यांच्या ब्रेस्ट कॅन्सरची (Breast Cancer) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे. या शस्त्रक्रियेमुळे तुळसाबाई हटकर आता कॅन्सरमुक्त झाल्या असून त्यांची प्रकृतीही धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात जळगावमधील कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक (Nilesh Chandak) यांनी म्हटलं आहे की, माझ्या दवाखान्यात तुळसाबाई हटकर यांना तपासणीसाठी त्यांचे नातेवाईक घेऊन आले होते. यावेळी त्यांच्या तपासण्या केल्या असता तुळसाबाई यांना स्तनाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. 


यावर उपाय म्हणून शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. मात्र त्यांचं वय हे शंभर वर्षांहून अधिक असल्याने शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलं. यावेळी नातेवाईकांनी आणि रुग्ण तुळसाबाई यांनी त्यांना ऑपरेशन करण्यास आमची तयारी असल्याचं डॉक्टरांना सांगितल. रुग्ण आणि नातेवाईक दोघांनी तयारी दर्शविली, मात्र वयाच्या शंभरीनंतर कोणत्याही रुग्णावर शस्त्रक्रिया केल्याचे उदाहरण डॉ. निलेश चांडक यांच्या माहितीत नव्हते. शिवाय त्यांनी आपल्या मित्र परिवारात चर्चा केली असता त्यांनीही असा धोका पत्करणे योग्य नसल्याचा सल्ला त्यांना दिला. मात्र रुग्ण असलेल्या तुळसाबाई हटकर यांचे या वयात ही असलेले बळकट शरीर आणि त्यांची इच्छाशक्ती पाहता डॉक्टरांनी त्यांची ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत त्यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया केली आहे. 



आमच्यासाठी डॉक्टर देवाप्रमाणे 


आज तुळसाबाई हटकर या कॅन्सरमुक्त तर झाल्या आहेत. शिवाय त्यांची प्रकृती ही आता धोक्याच्या बाहेर असल्याने त्यांना शंभरीनंतर पुन्हा एकदा पुनर्जन्म मिळाला असल्याचे बोलले जात आहे. वयाच्या शंभरीनंतर तुळसाबाई हटकर यांच्यावर कॅन्सर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देणाऱ्या डॉ. निलेश चांडक हे आपल्यासाठी देवाप्रमाणे असल्याची प्रतिक्रिया तुळसाबाई आणि त्यांचे नातेवाईकांनी दिली आहे. तर वयाच्या शंभरी नंतर कोणत्याही रुग्णावर शस्रक्रिया करणे हे मोठे आव्हान होते. ते यशस्वी रित्या पूर्ण केल्याचा आपल्याला आनंद असल्याची प्रतिक्रिया डॉ. निलेश चांडक यांनी दिली आहे. 


ही बातमी वाचा: