Maharashtra Jalgaon News:  जळगाव (Jalgaon News) शहरातील सुप्रीम कॉलनीत दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे.धार्मिक स्थळाच्या बांधकाम  करण्यावरून दोन गटात बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर थेट दगडफेकीत झाले. या दगडफेकीत चार ते पाच जण  किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून उर्वरित दगडफेक करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. सध्या या ठिकाणी शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 


धार्मिकस्थळी सुरु असलेल्या बांधकामाला विरोध करण्याच्या कारणावरुन सुप्रीम कॉलनी परिसरात काल दोन गटात वाद झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून  दगडफेक सुरू झाली तातडीने पोलिसांची कुमक या ठिकाणी पोहोचल्याने वेळीच परिस्थिती नियंत्रण आली. सुप्रीम कॉलनीतील ममता बेकरीजवळ हा प्रकार घडला. यामध्ये पाच जण किरकोळ जखमी झाले आहे.या घटनेनंतर दोन्ही गटातील महिला आणि तरुणांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली.


Maharashtra Jalgaon News : परिसरात तणावपूर्ण शांतता


शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात एका धार्मिक स्थाळाचे बांधकाम सुरु होते. या कामाला एका गटातील काही जणांकडून विरोध होता, यावरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून  दगडफेक करण्यात आली. या घटनेत  रविंद्र राठोड,समाधान राठोड, साजन राठोड, पवन पाटील, दिपक घुगे, श्रीकांत चौधरी असे एकूण पाच जण किरकोळ जखमी झाले आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे सुप्रीम कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.


Maharashtra Jalgaon News : नागरिकांना शांतता राखण्याचे पोलिसांकडून आवाहन


घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्ळे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.  त्यानंतर  बैठक घेऊन परिसरातील नागरिकांना शांतता राखण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.