जळगाव : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, आई-वडिलांच्या विरहातून तरुणाने  आत्महत्या (suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच वर्षांपूर्वी आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर तो घरात एकटाच राहत होता. आई-वडिलांच्या जाण्यामुळे तो एकटा पडला होता. तर तेव्हापासून तो नेहमी शांत-शांत राहत होता. दरम्यान, अशातच त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बाळासाहेब लोटन पवार ( 34 , रा. खोटेनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 


बाळासाहेब हा सकाळपासून घराबाहेर दिसला नाही म्हणून त्याचे घरमालक दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याला पहायले गेले. यावेळी त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच बाळासाहेबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. 


जळगाव शहरातील खोटे नगरात बाळासाहेब पवार हा अविवाहीत तरुण वास्तव्यास असून तो एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. बाळासाहेब पवार याच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या तीन बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे हा तरुण जळगावातील खोटेनगरात भाडेतत्वाच्या घरात एकटाच राहत होता. रविवारी दुपार झाली तरी तो घराबाहेर दिसला नाही. त्यामुळे त्याचे घरमालक त्याला पाहण्यासाठी त्याच्या खोलीजवळ गेले. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता, त्यांना बाळासाहेब पवार हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. 


एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दुःखाचा डोंगर


बाळासाहेब याला गळफास अवस्थेत पाहून या घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना देण्यात आले. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने बाळासाहेब पवार याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाळासाहेब पवार याला तीन बहिणी असून त्या सुरत, पुणे व धुळे जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


सतत चिंतेत....


बाळासाहेब याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यात तीनही बहिणींचे विवाह झाल्याने त्या देखील सासरी गेल्या होत्या. त्यामुळे बाळासाहेब घरात एकटा पडला होता. आई-वडिलांच्या निधनानंतर तो सतत एकटा एकटा आणि शांत राहत होता. त्याला यामुळे मोठा धक्का बसला होता. तर, आई-वडिलांच्या विरहातूनचं त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dhule Crime : बापाचं छत्र हरपलं, आईनं दुसरं लग्न केलं; अकरा वर्षांच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्याच्या आश्रमशाळेतील घटना