जळगाव : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत पावलेल्या 20 लोकांवर एकाच वेळी अत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जी एम फाऊंडेशनच्या वतीने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. उष्णतेच्या लाटेने (Jalgaon Heat Wave) या सर्वांचा मृत्यू झाला होता.
जळगाव जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला राहून उदरनिर्वाह करणाऱ्या पन्नासहून अधिक लोकांचा गेल्या आठ दिवसात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उष्णतेच्या लाटेने या सर्वांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी 30 जणांची ओळख पटली होती, पण इतर 20 मृतदेहांची ओळख मात्र पटली नव्हती. त्यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली
वाढत्या उष्णेतेच्या लाटेचा परिणाम म्हणून रस्त्याच्या कडेला राहून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या 50 अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हे सर्व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते.
यातील तीस जणांची ओळख पटली असली तरी वीस जणांची ओळख पटली नव्हती. ही मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अशा मृतदेहांवर तातडीने अंत्य संस्कार होणे गरजचे होते. मात्र यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचं लक्षात येताच मंत्री गिरीश महाजन यांच्या जी एम फाऊंडेशन या संस्थेने पुढाकार घेत दहा मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.
हे अंत्य संस्कार करण्यापूर्वी शहरातील नेरी नाका स्मशानभूमी परिसरात हे मृत देह पुरण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न केले होते. मात्र त्याला स्थानिक लोकांनी विरोध केल्याने एकाच वेळी एवढ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे मोठं आव्हान होतं. त्यामुळे रविवारी दहा मृतदेहावर तर सोमवारी दहा मृतदेहांवर जी एम फाऊंडेशनच्या वतीने अंत्य संस्कार करण्यात येत आहेत.
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत झालेले हे लोक विविध आजाराने ग्रस्त होते. त्यातच उन्हाचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. यासर्व मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यानं या सर्व व्यक्तींचा उन्हाच्या तीव्रतेनं मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. त्यानंतर आता ज्यांची ओळख पटली नाही त्या सर्व म्हणजे 20 मृतदेहांवर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा: