जळगाव : वीज पुरवठा खंडित झाल्याने जळगावच्या (Jalgaon) ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे (EVM Strong Room CCTV) डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद पडल्याची घटना घडली. मात्र तातडीने जनरेटर सुरू करून पुन्हा ते पूर्ववत सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेला दुजोरा दिला असून यात तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
जळगावमध्ये रविवारी सकाळी 9 वाजेपासून ते 9.04 मिनिटापर्यंत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद पडले होते. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरून ही माहिती कळवली होती. त्यानंतर लगेच हा वीज पुरवठा दुरुस्त करण्यात आला.
व्हिडीओ शुटिंग करून ठेवलं
बंद पडलेल्या चार मिनिटांच्या काळाचे व्हिडीओ चित्रण केले गेले असून या संदर्भात सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना ते दाखविण्यात आले असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच या बाबत कोणाचीही तक्रार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटर वरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेराचे डिस्प्ले बंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रसाद यांनी दिली. डिस्प्ले बंद झाले असले तरी या ठिकाणच्या सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहेत, तसेच यावेळी व्हीडीओ शूटिंग करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
जळगावच्या उमेदवारांचे भवितव्य मतदारपेटीत बंद
जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण पवार (Karan Pawar) आणि महायुती उमेदवार स्मिता वाघ (smita wagh) यांच्यामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये आता विजय कोणाचा होणार आणि हार कोणाची होणार हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र, दोन्ही गटांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने मागील निवडणुकीत तिकीट कापलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपामधील खासदार उन्मेष पाटील यांनी बंड पुकारून थेट उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपसह त्यांच्या नेत्यांना आव्हान देत, भाजपमधून बाहेर पडलेल्या करण पवार यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. एन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील यांचं बंड भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.
ही बातमी वाचा: