(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Crime : भुसावळमध्ये शेताजवळ गोळीबार, दोघे तरुण जखमी
Jalgaon Crime : जळगावच्या भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या एका शेताजवळ शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दोन तरुणांवर गोळीबार केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
Jalgaon Crime : जळगावच्या भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या एका शेताजवळ शुक्रवारी (15 एप्रिल) रात्री 10 वाजेच्या सुमारास दोन तरुणांवर गोळीबार (Firing) केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांच्या गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (वय 26 वर्षे, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (वय 24 वर्षे, भुसावळ) हे दोघे तरुण जखमी झाले असून त्यांना डोक्याला आणि पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जेवणासाठी निघालेल्या तरुणांवर शेताजवळ गोळीबार
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगेश आणि अक्षय आदी दुचाकीने जेवणासाठी निघाले होते. साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या एका शेताजवळ (Farm) दोन्ही तरुण आले असता, हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्या. बेसावध असलेले दोन्ही तरुण या हल्ल्यात जखमी झाले. दोन्ही तरुणांवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, भुसावळ तालुका निरीक्षक विलास शेंडे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे आणितालुका पोलीस ठाण्याच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबारात अक्षय सोनवणे या तरुणाच्या पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे त्याला गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर दुसरा जखमी तरुण मंगेश काळे याच्या डोक्याला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावर डॉ उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तरुणांवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची माहिती
पूर्ववैमनस्यातून तरुणांवर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाल्यानंतर त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गोळीबाराच्या घटनेनंतर गोदावरी रुग्णालयात धाव घेत जखमीची भेट घेत गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.
आर्थिक अडचणीमुळे एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन केलं, एकाचा मृत्यू
दुसरीकडे जळगाव तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील वृद्धासह पत्नी आणि मुलगा अशा तीन जणांनी एकाच वेळी विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता घडली होती. या घटनेत वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. नारायण दंगल पाटील (वय-66 वर्षे, रा. वडली ता .जळगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे.