देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Gulabrao Patil vs Gulabrao Deokar : विधानसभा निवडणुकीनंतर जळगावमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जळगाव : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी देवकर यांचे भ्रष्टाचार आपण काढणार असून त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जळगावमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात (Jalgaon Gramin Vidhan Sabha Constituency) महायुतीकडून (Mahayuti) गुलाबराव पाटील तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) गुलाबराव देवकर यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या लढतीत गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर देवकर यांनी आपण अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.
जळगावात पुन्हा गुलाबराव विरुद्ध गुलाबराव संघर्ष?
यानंतर गुलाबराव पाटील यांनी देखील आपण त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असून त्यांना सोडणार नसल्याचा थेट इशारा दिला आहे. यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा एकदा गुलाबराव विरुद्ध गुलाबराव असा सामना जळगावमध्ये पाहायला मिळत आहे. तर गुलाबराव देवकर यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवार यांच्या गटातून त्यांना विरोध झाल्याचे दिसून आले. अजित पवार यांनीही देवकर यांच्या प्रवेश निर्णयाबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल अस सांगत या विषयाला तूर्तास बाजूला सारले आहे.
सत्ताधारी पक्षात जाण्याची घाई का?
विरोधी पक्षात राहून आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आपण निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे गुलाबराव देवकर यांनी म्हटले. तर दुसरीकडे गुलाबराव देवकर यांना पराभव झाल्यानंतर सत्ताधारी पक्षात जाण्याची घाई का झाली? त्यांचे अनेक ठिकाणी असलेले भ्रष्टाचार टाळता यावे यासाठी ते असा प्रयत्न करत असले तरी त्यांना अजित पवार गटातून विरोध होत आहे. आपणही त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असून, त्यांना सोडणार नसल्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.
देवकरांच्या प्रवेशावर संजय पवारांचं सूचक वक्तव्य
दरम्यान, गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशावर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. पक्षाचा विस्तार करण्याचा विचार करता कोणीही पक्षात येत असेल तर त्याच स्वागतच केले जाईल. मात्र, पक्षातून देवकर यांच्या प्रवेशाला अनेकांनी विरोध केला आहे. त्यामुळे या बाबतचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली आहे. याबाबत गुलाबराव देवकर यांना विचारणा केली असता आपण कोणतेही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा