Girish Mahajan on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली होती. आश्वासन, टीका-टीप्पण्णी करणे या पलिकडे सरकारने काय केले आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शरद पवारांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. 


जळगाव (Jalgaon) येथे पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, मोदी गॅरंटी काय आहे हे जनतेला माहीत आहे. शरद पवार इतके वर्ष राज्यात होते. तुम्ही राज्यासाठी काय केले? कृषीमंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले असे त्यांना विचारले तर त्यांना वाईट वाटेल. मोदी गॅरंटीची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा, लोक सांभाळा. तुमचे खाते उघडण्याच्या तयारीत राहा. उगाच कोणी काय केले असे विचारत बसू नका, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 


एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांचे सूचक वक्तव्य


ते पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या गौण खनिजप्रकरणी त्यांना झालेल्या दंडात्मक कारवाईवर स्थगिती मिळाल्याचं एकले. या संदर्भात ही स्थगिती कोणी दिली? कशी दिली? याची आपण चौकशी करणार आहोत. एकनाथ खडसे भाजपामध्ये येत आहेत असे कोणतेही संकेत मला दिसत नाही. हा सगळा निर्णय राज्याचे नेतृत्व आणि केंद्रातून घेतला जात असतो. खडसे मात्र भाजपामध्ये पुन्हा येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत, धडपड करत आहे हे मात्र निश्चित दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. 


लोकसभा उमेदवारीबाबत काय म्हणाले गिरीश महाजन


गिरीश महाजनांना लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024) उमेदवारी मिळणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, पक्षाने जबाबदारी दिली तर आपण लोकसभा काय तर संघाचं काम करण्यास देखील तयार आहे. लोकसभेबाबत मला पक्षाने अद्याप विचारले नाही. आमचे मित्र गुलाबराव हे प्रेमाखातर अशा बातम्या पसरवत आहेत. लोकसभेच्या यादीत किंवा चर्चेत आपले नाव नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 


चारशे पारसाठी आमचा प्रयत्न - गिरीश महाजन


महायुतीच्या जागावाटपाबाबत गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले की, जागा वाटपाबाबत आमच्या तीनही पक्षात एक वाक्यता आहे. त्यामुळे वाद विवाद होणार नाही. निवडणुकीच्या जागा मिळण्यासाठी प्रत्येक जण आग्रही असतो. पण त्यावर निर्णय एकमताने होणार आहे. त्यात कोणताही ताणतणाव नाही, चारशे पारसाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही काम करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Raosaheb Danve : 'भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात'; रावसाहेब दानवेंचा नाशकात 'चिट्ठी बॉम्ब'