आरोप-प्रत्यारोपानंतर खडसे, फडणवीस आणि महाजन जळगावमध्ये एकत्र, झेडपीवरही भाजपचा झेंडा
एबीपी माझा, वेब टीम | 03 Jan 2020 05:51 PM (IST)
तिन्ही नेत्यांमध्ये जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती खडसेंनी दिली. अन्य कुठलीही चर्चा झालेली नाही, असा दावा खडसेंनी केला. तर, फडणवीस आणि खडसेंमध्ये लवकरच मनोमिलन होण्याची आशा महाजनांनी व्यक्त केली. या बैठकीनंतर फडणवीस हेलिकॉप्टरनं नंदुरबारला तर महाजन-खडसे एकाच गाडीतून पुढे रवाना झाले.
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीकास्त्र सोडणारे भाजपतील नाराज नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांची जळगावात एकत्रित भेट झाली. दोन दिवसांपूर्वी खडसे यांनी थेट नावं घेत फडणवीस आणि महाजनांनी जाणीवपूर्वक आपलं तिकीट कापलं असल्याचा आरोप केला होता. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. एकीकडे खडसे-महाजन-फडणवीस वाद तर दुसरीकडे जळगाव जिल्हापरिषदेची निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष जळगावच्या राजकारणाकडे लागून होते. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र आल्याने भाजपसमोर आव्हान होते मात्र भाजपने आपला गड कायम राखण्यात यश मिळवले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील जळगाव जिल्हा परिषदेत भाजपनं आपला 30 वर्षांचा गड राखला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील, तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांना 34 मतं मिळाली. त्यात काँग्रेसच्या एका सदस्यानं बंडखोरी केली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 30 मतं मिळाली आहेत. भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची विजयाचा चंग बांधला होता. त्यासाठी दोन्ही नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्येच ठिय्या मांडला होता. त्यामुळं अखेर जळगावचा गड भाजपनं राखण्यात यश मिळालं. महाविकासआघाडीकडे जास्त जागा असून भाजपची बाजी राज्याच्या दृष्टीने अतिशय लक्षवेधी असलेल्या जळगाव जिल्हापरिषदेवर आज भाजपने आपली गेल्या तीस वर्षांची विजयी परंपरा कायम राखण्यात यश मिळवले. अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले. या निवडणुकीचा विचार केला तर एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि महाविकास आघाडीचे गुलाबराव पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची होती. तितकीच प्रतिष्ठेचीही होती. खुल्या वर्गासाठी महिला राखीव असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपच्या रंजना पाटील यांनी महाविकास आघाडीच्या रेखा राजपूत यांचा 34 विरुद्ध 31 अशा मतांनी पराभव केला. भाजपकडे स्वबळाचे 33 उमेदवार होते. यामध्ये नंदा सपकाळे या आजारी असल्यानं गैरहजर राहिल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन सदस्य आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश मिळाले आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे दिलीप पाटील, तर राष्ट्रवादीच्या मीना पाटील यांच्यासह आणखी एक सदस्य गळाला लावण्यात भाजपला यश मिळाले आहे. या लढतीमध्ये एकूण 66 सदस्यांचं मतदान होतं. पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजप 33, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 16, शिवसेना 15 अशा प्रकारचं बलाबल होतं. खडसे- महाजन-फडणवीस मनोमिलन? दरम्यान याआधी, तिन्ही नेत्यांमध्ये जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती खडसेंनी दिली. अन्य कुठलीही चर्चा झालेली नाही, असा दावा खडसेंनी केला. तर, फडणवीस आणि खडसेंमध्ये लवकरच मनोमिलन होण्याची आशा महाजनांनी व्यक्त केली. या बैठकीनंतर फडणवीस हेलिकॉप्टरनं नंदुरबारला तर महाजन-खडसे एकाच गाडीतून पुढे रवाना झाले. त्यामुळे आता फडणवीस या बैठकीबाबत काय बोलताहेत, हे पाहणं महत्वाचं आहे. आज जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होतेय. राज्यातील सत्ता हातून गेल्यानंतर आता जळगाव जिल्हा परिषद आणि नंदुरबारमधील पंचायत समिती राखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेतील विजयानंतर खडसे यांनी भाजपची सत्ता यापुढेही कायम राहील. जळगावचा गड राखल्यानंतर एकनाथ खडसे आणि गिरीष महाजनांनी एकत्र येत पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. जळगावचा जिल्हा परिषदेचा गड राखल्यानंतर भाजप नेते गिरीष महाजनांनी हे संघटनात्मक यश असल्याचं सांगितलं आहे. जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आमच्यात कुठेही कटूता नाही, हे तुम्हाला दिसलं असेल, असंही महाजन म्हणाले. खडसे यांचा नाराजीनामा शमला का? 36 तासांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि महाजन यांच्यासोबत 36 चा आकडा असलेले खडसे बरोब्बर 36 तासानंतर त्यांच्याचसोबत चहापानात रमले होते. त्यामुळे खडसे यांचा नाराजीनामा शमला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीसांवर नाराज होते. त्यांची खदखद कधी पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावरुन दिसली. तर थेट दिल्लीतही दिसली. पण त्याचा कळस गाठला गेला तो एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत. या मुलाखतीत खडसेंनी थेट फडणवीस आणि महाजन यांची नावं घेत टीका केली.