मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल गोपीनाथ गडावरून केलेल्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं आहे. खडसे हे काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र खडसे जे बोलले ते बोलायला नको होते असे फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. फडणवीस यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे आरोप खडसे यांनी गोपीनाथगडावरुन केले होते. नाथाभाऊ अनेकदा असं बोलतात ते त्यांच्या मनात नसतं पण ते बोलून जातात. मात्र यामुळं त्यांचं नुकसान होतं, असंही फडणवीस म्हणाले. खदखद योग्य ठिकाणी मांडायला हवी. खडसे यांच्या मुलीला तिकीट दिलंच की. त्यांना तिकिट न देण्याचा केंद्राचा निर्णय होता. राज्यातून नव्हता, असेही ते म्हणाले. त्यांनी अशाप्रकारे त्यांनी बोलायला नको होतं. मंचही योग्य नव्हता. तो जयंतीचा कार्यक्रम होता, असंही फडणवीस म्हणाले.

खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबत केलेल्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक झालं नाही असा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपात काही तथ्य नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं डिझाईन तयार होण्यात काहीसा वेळ गेला. ते झाल्यानंतर त्या स्मारकाला सिडकोतून निधी देण्यात आला आणि त्याचे वर्क ऑर्डरही आली. खडसे यांनी उद्धवजींकडे पैसे मागण्याची गरज नाही, त्यांनी स्थगिती दिली असेल तर वेगळी गोष्ट आहे असाही टोला फडणवीस यांनी लगावला. भाजपा सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या चांगल्या स्मारकासाठी 46 कोटींचा निधी मंजूर केला. त्याच्या कामाची सुरुवात होते आहे. एवढंच नाही तर चार महिन्यांपूर्वीच LOA मान्य झाला होता. आचारसंहिता लागू झाली त्यामुळे काम थांबलं. लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मारकाचं टेंडर निघालं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा - शिवसेनेने महायुतीला मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केला; फडणवीसांचा आरोप

यावेळी फडणवीस यांनी भाजपा हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहिल असं देखील म्हटलं आहे. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजपाच्या सरकारमध्ये होते. ओबीसी मंत्रालय स्थापन झालं तेदेखील भाजपाच्याच सरकारमध्ये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्या काळात ओबीसी मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले. एवढंच नाही तर भाजपमध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपचे सगळे आमदार आमचेच आहेत असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

हे देखील वाचाDevendra Fadnavis Exclusive | आमच्यासोबत येण्याआधी अजित पवार शरद पवारांशी बोलले होते : देवेंद्र फडणवीस

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नाराज आहेत याबाबत त्यांना विचारलं असता, फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा त्यांच्या बाजूने मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो. माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहे. आजही आहे, उद्याही राहील, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपचा पराभव झालेला नाही. आम्ही उलट कमी जागा लढवून जास्त जागा जिंकलो. हे खरं आहे की आम्हाला जास्त जागा येतील अशी अपेक्षा होतील. आम्हाला 130 जागा येतील असं वाटलेलं. महायुतीला म्हणून लोकांनी बहुमत दिलं आहे, दोघांच्या जागा बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे आमचा पराभव झालेला नाही, असेही ते म्हणाले. मी पुन्हा येईन हा शब्द आम्ही म्हणूनच आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.