नवी दिल्ली: 'योग सेवक' या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाराणसीमधील 125 वर्षांच्या स्वामी शिवानंद यांना आज पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार घेण्यासाठी उठलेल्या स्वामी शिवानंद यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंडवत घातलं. नंतर त्यांनी राष्ट्रपतींना दंडवत घातलं. स्वामी शिवानंद यांना पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: जागेवरुन उठून त्यांच्याजवळ आले आणि त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
वाराणसी येथील 125 वर्षाच्या स्वामी शिवानंद यांनी त्यांचे आयुष्य हे भारतीय जीवन पद्धती आणि योगाच्या प्रसारासाठी खर्ची केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्या पुरस्काराचे वितरण आज राष्ट्रपती भवनमध्ये केलं गेलं.
पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना दंडवत
पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा स्वामी शिवानंद यांचं नाव पुकारण्यात आलं त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ जाऊन त्यांना दंडवत घातला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या जवळ जाऊन त्यांनाही दंडवत घातला. त्याचवेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी स्वामी शिवानंद यांना उठवलं. नंतर त्यांनी स्वामी शिवानंद यांना हा पुरस्कार प्रदान केला.
कोण आहेत स्वामी शिवानंद?
स्वामी शिवानंद यांचा जन्म 1896 साली बंगालमध्ये झाला. ते सहा वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला. नंतर ते काशीला आले. गुरु ओकांरानंद यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार विश्व यात्रा केली. स्वामी शिवानंद हे 29 व्या वर्षी लंडनला गेले आणि 34 व्या वर्षीपर्यंत जग फिरत राहिले. या काळात त्यांनी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया इत्यादी देशांची यात्रा केली आणि ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी आपले जीवन हे भारतीय जीवन पद्धती आणि योग प्रसार यासाठी खर्ची केले.
128 जणांना पद्म पुरस्कार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार देण्यात आले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha