Wrestlers in Police Custody : दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पोलीस आणि आंदोलक पैलवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी पैलवानांना ताब्यात घेतलं.


दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवला. नवीन संसद भवनाकडे आगेकूच करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी अडवलं. यावेळी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक पैलवानांना ताब्यात घेण्यात आलं. 


पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. येथून संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे. तत्पूर्वी कुस्तीपटू दोन अडथळे पार करून येथे पोहोचले. कुस्तीपटूंनी आज नव्या संसदेला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी आंदोलन पुकारलं आहे. नव्या संसद भवनाबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती कुस्तीपटू साक्षी मलिकने दिली आहे.  


भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीवर कुस्तीपटू ठाम आहेत. महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. 23 मे रोजी दिल्लीत इंडिया गेटवर कँडल मार्च काढल्यानंतर आता महिला पंचायतच्या तयारीला वेग आलाय. यामध्ये सामील होण्यासाठी पैलवानांनी लोकांना आवाहन केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Wrestlers Protest: "आम्ही तयार... फक्त सर्वोच्च न्यायालयामार्फत नार्को टेस्ट करावी"; बजरंग पुनियानं स्विकारलं बृजभूषण सिंहांचं आव्हान