Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत नार्को टेस्ट (Narco Test) करण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यासाठी त्यांनी एक अट घातली होती. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी अट बृजभूषण शरण सिंह यांनी घातली होती. याला प्रत्युत्तर देताना कुस्तीपटू बजरंग पुनियानं बृजभूषण शरण सिंह यांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे, ते तर आता बोलत आहेत, असं म्हणत बजरंग पुनियानं नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं सांगितलं. पण बजरंग पुनियानंही एक अट घातली आहे. 


कुस्ती महासंघाचे घोटोळे मोजायचे असतील तर मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण माझ्यासोबत विनोद तोमर, जितेंद्र (महिला कुस्तीपटूंचे मुख्य प्रशिक्षक), फिजिओ धीरेंद्र प्रताप यांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी बजरंग पुनियानं केली आहे. त्यासोबतच ज्या मुली गेल्या कित्येक दिवसांपासून बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप करत आहेत, त्या आधीपासूनच म्हणत आहेत, आमची नार्को टेस्ट करा म्हणून, त्यामुळे त्या तयार आहेत नार्को टेस्ट करायला, असं बजरंग पुनिया म्हणाला. 


ते दोषी आहेत, त्यांना स्टार बनवू नका : बजरंग पुनिया 


कुस्तीपटूंच्या पत्रकार परिषदेत साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर यापूर्वीच केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. बजरंग पुनिया म्हणाले की, "काल बृजभूषण यांनी नार्को टेस्टबाबत वक्तव्य केलं होतं. सर्वोच्च न्यायालयामार्फत नार्को टेस्ट करावी. संपूर्ण देश लाईव्ह पाहील."


तक्रार करणाऱ्या 7 मुलींचीही नार्को टेस्ट व्हायला हवी, असंही कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला. आम्ही तयार आहोत. दोषी आढळल्यास कारवाई करावी, असंही बजरंग पुनिया म्हणाला. ते (बृजभूषण शरण सिंह) 500 किमी दूर बसून काहीही बोलत आहेत. पोलीस आमची दिशाभूल करत आहेत, असंही बजरंग पुनिया म्हणाला. तसेच, ज्या व्यक्तीवर 7 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे, त्याला हिरो बनवू नका. तो दोषी आहे. विनेश फोगट म्हणाल्या की, ज्या व्यक्तीवर 7 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे, त्याला हिरो बनवू नये. तो दोषी आहे, त्याला स्टार बनवू नका. 


नार्को टेस्ट लाईव्ह व्हायला हवी : विनेश फोगट


कुस्तीपटू विनेश फोगट म्हणाली की, त्यांनी (बृजभूषण) माझं आणि बजरंगचं नाव घेतलं आहे. ज्या मुलींनी तक्रार केली आहे, त्या सगळ्या तयार आहेत. त्यांनी काय केलं, हे संपूर्ण देशानं पाहावं. नार्को टेस्ट लाईव्ह व्हायला हवी." मंगळवारी (23 मे) इंडिया गेटवर येऊन आम्हाला पाठिंबा द्या, असं यावेळी बोलताना कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली. 


काय म्हणाले होते बृजभूषण सिंह? 


बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, "जर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया त्यांची टेस्ट करण्यास तयार असतील, तर पत्रकारांना बोलावून त्यासंदर्भात घोषणा करा. मी त्यांना वचन देतो की, मीही यासाठी तयार आहे." तसेच, पुढे बोलताना त्यांनी ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. "मी यापूर्वीही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि यापुढेही या वक्तव्यावर ठाम राहीन हे मी माझ्या देशवासियांना वचन देतो." दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करुन यासंदर्भात मागणी केली. 


जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन 


कुस्तीपटू गेल्या 28 दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.