Wrestlers Protest: देशाची राजधानी दिल्लीत नव्या संसदेचं लोकार्पण होत असतानाच आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर भर रस्त्यात बळाचा वापर आंदोलन मोडीत काढले आहे. कुस्तीपटूंवर केलेल्या बळाच्या वापराने काँग्रेसकडून पीएम मोदींवर कडाडून हल्ला चढवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानतंर नव्या संसदेसमोर झटापट झाली. बॅरिकेट्स ओलांडून पैलवान नवीन संसदेच्या दिशेने कूच करत असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखत बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले. 






दिल्ली पोलिसांनी एवढ्यावर न थांबता जंतर-मंतरवरील तंबू, खुर्च्या आणि इतर वस्तू हटवून आंदोलन मोडीत काढले. विनेश आणि संगीता फोगट यांना दिल्लीतील कालकाजी पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. गेल्या 34 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू नव्या संसदेसमोर होत असलेल्या महिला महापंचायतीत सहभागी होणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी दिली नाही. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पैलवानांनी महापंचायत आयोजित करून संसदेच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंवर बळाचा वापर केला. 






बजरंग पुनिया म्हणाला, आम्हाला गोळ्या घाला 


कुस्तीपटूंनी बळाचा वापर करून रोखण्यात आल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया अत्यंत संतप्त झाला. त्याने ही लोकशाही आहे का? अशी विचारणा करत आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत आणि आमच्याशी अशी वागणूक होत आहे. आम्हाला गोळ्या घाला अशी संतप्त भावना व्यक्त केली. दुसरीकडे, महापंचायतीत हरियाणा, यूपी आणि पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळीच सिंघू आणि टिकरी सीमा बंद केली होती. 


राजधानी दिल्लीतील केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन मेट्रो स्टेशनची एंट्री आणि एक्झिटही बंद करण्यात आली होती. हरियाणातील सोनीपतजवळ सिंघू सीमेवरील शाळेत तात्पुरते जेल करण्यात आले होते. हरियाणा पोलिसांनी रविवारी सकाळी हिसार, सोनीपत, पानिपत, रोहतक, जिंद आणि अंबाला येथे खाप प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले होते.






पाच राज्यातील शेतकरी महिला महापंचायतीला


भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी दिल्लीतील नवीन संसद भवनाबाहेर ही महापंचायत होणार होती. कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक 23 एप्रिलपासून ब्रिजभूषणच्या अटकेसाठी जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. महिला महापंचायतीत हरियाणा व्यतिरिक्त यूपी, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब आणि दिल्ली येथील खाप भागातील लोक आणि शेतकरी सहभागी होणार होते.


इतर महत्वाच्या बातम्या